jata nirmulan

कल्याण : कल्याण येथे राहणार्‍या एका महिलेच्या डोक्यात जटा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे(अंनिस) कार्यकर्ते तृप्ती पाटील, गणेश शेलार, दत्ता आणि कल्पना बोंबे, उत्तम जोगदंड यांनी त्या महिलेची भेट घेऊन समुपदेशन केले.

कल्याण : कल्याण येथे राहणार्‍या एका महिलेच्या डोक्यात जटा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे(अंनिस) कार्यकर्ते तृप्ती पाटील, गणेश शेलार, दत्ता आणि कल्पना बोंबे, उत्तम जोगदंड यांनी त्या महिलेची भेट घेऊन समुपदेशन केले.

डोक्यात पहिल्यांदा तयार झालेली जट कापल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला होता. असा गैरसमज निर्माण होऊन महिलेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती आणि त्यानंतर परत तयार झालेली जट न कापल्याने ती वाढत जाऊन खूप मोठ्या प्रमाणात केसांमध्ये जटा निर्माण झाल्या होत्या. यामुळे या महिलेच्या सामाजिक वावरावर मर्यादा आल्या होत्या. समुपदेशनादरम्यान या महिलेची भीती दूर करण्यात आली, गैरसमज दूर करण्यात आले. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी जटा काढण्यात याव्यात यासाठी त्यांनी सहमती दिली.

कल्याण शाखेची कार्यकर्ती आणि ब्युटी पार्लर संचालिका दुहिता जाधव हिने या महिलेची जट अत्यंत कौशल्याने काढून टाकली. तत्पूर्वी ही महिला आणि त्यांच्या कन्येकडून सहमती-पत्र घेण्यात आले होते. यावेळी अंनिस राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, ठाणे जिल्हा सचिव गणेश शेलार, राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तम जोगदंड, ठाणे जिल्हा पदाधिकारी कल्पना बोंबे हे उपस्थित होते. त्यांनी त्या महिलेचे कौतुक केले आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

गेली जवळपास तीन दशके बाळगलेल्या जटांचे निर्मूलन झाल्याने ती महिला आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत आनंदित झाले दिसले आणि त्यांनी अंनिसचे मनःपूर्वक आभार मानले. आईच्या जटेचे निर्मूलन व्हावे म्हणून त्या महिलेची कन्या खूप प्रयत्न करीत होती. आज तिच्या प्रयत्नांना फळ आल्याने तिला गहिवरून आले होते. यावेळी, ओळखीची अन्य कोणी जट-पीडित महिला आढळल्यास तिचे जटा-निर्मूलनासाठी मन वळविण्याचे आश्वासनही ती महिला आणि कुटुंबियांनी दिले.

ठाणे जिल्ह्यात आपल्या आसपास कोणी जटा-पीडित महिला आढळून आल्यास आणि त्यांना जटांपासून मुक्ति हवी असल्यास गणेश शेलार (संपर्क क्र. ८६००१८०३०३) किंवा उत्तम जोगदंड (संपर्क क्र ९९२०१२८६२८) यांच्याशी संपर्क साधावा किंवा अन्य ठिकाणच्या लोकांनी जवळच्या महा अंनिस शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन महा अंनिस तर्फे करण्यात आले आहे.