आ. मंदा म्हात्रे यांच्या नाराजीने नवी मुंबईतील राजकारणाची दिशा बदलणार?, नाराजी भाजपासाठी ऐन निवडणुकीत घातकी ठरण्याची शक्यता

ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर या घडामोडी घडत असल्याने आजतागायत आ. मंदा म्हात्रे यांना सोबत देणाऱ्या म्हात्रे गट देखील संभ्रमात आहे. भाजपाची कमळाची पाकळी देखील नवी मुंबईत नसताना मंदा म्हात्रे यांनी थेट नवी मुंबईत कमळ फुलवून जायंट किलरचा बहुमान मिळवला होता. त्यांनंतर मात्र आ. म्हात्रे यांनी सातत्याने बेलापूर मतदार संघात नागरी कामांचा रतीब उभा करत मतदार संघात भाजपाचे स्थान अढळ केले होते.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना माथाडी कामगारांच्या लसीकरण कार्यक्रमात डावलले गेल्याचे पडसाद समाज माध्यमांवर उमटलेले असतानाच; खुद्द आ.मंदा म्हात्रे यांनीच आता या गटबाजीवर खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात मनातील खदखद व्यक्त केल्याने; पालिका निवडणुकांच्या दृष्टीने मविआच्या तुलनेत सध्या जोमात असलेला भाजपा बॅकफूटवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जाते. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावा लागतो आहे.

  एखादी स्त्री चांगले काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केले जाते मला तिकीट दिले किंवा नाही दिले तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. आपल्याच पक्षातील माणसं, जर एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली, तर मग त्याला भीती निर्माण होते. मग भीती निर्माण झाल्यावर फोटो टाकायचा नाही, कार्यक्रमाला बोलवायचे नाही. अशी जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे.  काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपले काम करत राहायचस, असे यावेळी आ.मंदा म्हात्रे म्हणाल्या.

  मुख्य म्हणजे यावेळी या कार्यक्रमात काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेच्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर तसेच इतर पक्षीय महिला आमदार देखील होत्या. त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेली खदखदीला महत्व प्राप्त झाले आहे. मुख्य म्हणजे माथाडींच्या कार्यक्रमाला बॅनरवर फोटो नसल्याने त्याचे पडसाद कार्यक्रमाच्या आधीच उमटू लागले होते. ही बाब भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर।देखील गेल्याची चर्चा होती. मंदा म्हात्रे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न केले होते.

  मात्र स्वाभिमानी बाणा जपणाऱ्या मंदा म्हात्रे यांनी अपमानास्पद वागणुकीबाबत नाराजी व्यक्त करत कार्यक्रमास गैरहजर राहणेच पसंत केले होते. या प्रकरणामुळे कदाचित फडणवीस यांनी देखील इतर कार्यक्रमांचे कारण देत कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याची चर्चा देखील रंगली होती. याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र  मनातील या खदखदीला वाट मोकळी करून दिल्याने नवी मुंबईतील राजकारणाला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सातय्याने मंदा म्हात्रे यांच्या नाराजीची चर्चा असून; मंदा म्हात्रे यांनी देखील यापूढे तिकीट मिळो अथवा न मिळो मी लढणारच असा पण करून पक्षालाच आव्हान दिले आहे.

  ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर या घडामोडी घडत असल्याने आजतागायत आ. मंदा म्हात्रे यांना सोबत देणाऱ्या म्हात्रे गट देखील संभ्रमात आहे. भाजपाची कमळाची पाकळी देखील नवी मुंबईत नसताना मंदा म्हात्रे यांनी थेट नवी मुंबईत कमळ फुलवून जायंट किलरचा बहुमान मिळवला होता. त्यांनंतर मात्र आ. म्हात्रे यांनी सातत्याने बेलापूर मतदार संघात नागरी कामांचा रतीब उभा करत मतदार संघात भाजपाचे स्थान अढळ केले होते. पालिका निवडणुकांत म्हात्रे यांना यश मिळवून देता आले नसले तरी विधानसभा निवडणुकांत आमदारकीसाठी त्यांनी ठोकलेला शड्डू पक्षाला देखील गंभीर्याने घ्यावा लागला होता. अशा परिस्थिती आ. म्हात्रे यांनी एकहाती बेलापूर मतदार संघ जिंकत इथे फक्त ताईंचीच सत्ता चालेल असा मापदंड घालून दिला आहे.

  येत्या निवडणुकांत देखील भाजपाला आ. मंदा म्हात्रे यांनाच महिला व विद्यमान आमदार म्हणून प्रथम पसंती द्यावी लागणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ असताना आ. मंदा म्हात्रे यांना डावलणे व त्यांनी उघडपणे खदखद व्यक्त करणे हे भाजपासारख्या निष्टवंतांची ‘जाण’ ठेवणाऱ्या पक्षाला काहीसे मारक ठरण्याची शक्यता आहे. २०१५ साली आ. मंदा म्हात्रे यांना जरी पालिका निवडणुकीत स्वतःचा ठसा उमटवता आलेला नसला तरी; गेल्या पाच वर्षांत आ. मंदा म्हात्रे यांनी मतदारसंघात निर्माण केलेली ताकद ही पक्षाला तारक व प्रसंगी मारक देखील ठरण्याची शक्यता आहे.

  सध्या आमदार गणेश नाईक यांच्याकडून सातत्याने नागरी समस्यांबाबत पाठपुरावा केला जात आहे. तर आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून नागरी कामांसह नवी मुंबईत नव्या वास्तू उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दादा ताईंचा वाद असला तरी; दोन्ही अमदारांकडून केल्या जात असलेल्या कामांमधून पक्षालाच लाभ होत आहे. मात्र यात माजी आमदार नरेंद्र पाटलांनी बॅनररबाजी प्रकरणातून उडी घेतल्याने आ. म्हात्रे यांना आपण एकट्या पाडले जात आहोत हे वाटणे साहजिकच आहे. याबाबत पक्षश्रेष्टींकडून वेळीच हस्तक्षेप करून तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा  नाराज मंदा म्हात्रे यांचे उपद्रव मूल्य पालिका निवडणुकांत भाजपाला घातकी ठरण्याची शक्यता आहे.