महापौरांना मेनका गांधींनी केला कॉल; कबुतरांना चारा घालणाऱ्यांवर पालिका दंड आकारणार का? असे विचारले

ठाणे : ठाण्यात अनेक ठिकाणी कबुतरांना चारा टाकण्यात येतो. नियमितपणे चारा टाकल्याने कबुतरांची गर्दी होते. त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.  दरम्यान ठाण्यातील नागरिकांच्या तक्रारीवरून ठाणे महापालिकेने कबुतरांना चारा  टाकण्यास बंदी केली आहे. अशा प्रकारे कबुतरांना चारा टाकणाऱ्या नागरिकाला आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठाणे महानगर पालिकेकडे ठाण्यातील अनेक गृहसंकुले आणि नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत की, कबुतरांना चारा टाकल्याने एकत्र जमणाऱ्या कबुतरांमुळे त्यांच्या विष्टे पासून “हायपर सेंसेटिव्ह न्यूमेनिया” सारखे आजार बळावत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.

अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याने ठाणे महानगर पालिकेने कबुतरांना चारा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. तसे फलकही शहरात लावले

ठाणे महापौरांना मेनका गांधींचा फोन

कबुतरांना चारा  टाकण्यावर ठाणे महापालिकेने लावलेल्या निर्बंध आणि फलक याबाबत मेनका गांधी यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला. महापौरांनी त्यांना सदर निर्बंध हे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार लावण्यात आलेले आहेत. मात्र तलावपाळी, मासुंदा तलाव सारख्या सार्वजनिक ठिकाणी आम्ही दंडात्मक कारवाई करणार नसल्याचे उत्तर दिले. भविष्यात ठाण्यात मुंबई प्रमाणे कबुतर खाने तयार करण्याचा मानस असल्याचे स्पष्ट केले.