कोरोनाची लस आल्यास आम्हाला देखील टोचावी, महापौर नरेश म्हस्के यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाची लस (vaccine) उपलब्ध झाल्यानंतर लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य कर्मचारी व पोलीस (Police) कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रक्रमाने समावेश करावा अशी मागणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठाणे : कोरोना महामारीचे (Corona Virus) संकट आल्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सर्वच स्तरातून अथक परिश्रम करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा केली असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाची लस (vaccine) उपलब्ध झाल्यानंतर लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य कर्मचारी व पोलीस (Police) कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रक्रमाने समावेश करावा अशी मागणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजतागायत त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक तसेच आमदार, खासदार यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना नगरसेवक दिवस-रात्र कोरोना रुग्णांसाठी आजही काम करत आहेत. हे करत असताना काही लोकप्रतिनिधींना आपला जीव गमवावा लागला आहे.

यामध्ये ठाण्याचे नगरसेवक मुकुंद केणी, ‍विलास कांबळे, कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाडीगांवकर, मीरा-भाईंदरचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक दत्ता साने यांसह मुंबई वसई-विरार या परिसरात कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोकप्रतिनिधी कोविड बाधीत देखील झाले, त्यातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा जनतेची सेवा करीत असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी निवेदनात नमूद केले आहे.

कोरोना महामारीचे संकट आल्यापासून आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे, आरोग्य यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्ण्वाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना अॅडमिट करणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करणे, कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, सतत पालिका आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे, नागरिकांमध्ये कोरोना आजाराबाबत जनजागृती करणे, वेळप्रसंगी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना भेटून दिलासा देणे, आवश्यक मदत देणे अशा असंख्य कामांमध्ये नगरसेवक आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून गेल्या सात-आठ महिन्याच्या कालावधीमध्ये काम करीत आहेत.

महापालिका अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि पोलीस या सर्व यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून स्थानिक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या युद्धामध्ये प्रत्येक आघाडीवर काम करताना अनेकांच्या संपर्कात येत असल्यामुळे हायरिस्कमध्ये असतात. समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकप्रतिनिधींना देखील आरोग्याच्या दृष्टीने संरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कोरोना प्रतिबंध लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रक्रमाने समावेश करावी अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्रयांकडे केली आहे.