भिवंडी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची एमआयएमची मागणी

भिवंडी: देशात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. देशात ७० दिवसांपासून लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. यातच भिवंडीतील इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अनिल थोरात

 भिवंडी: देशात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. देशात ७० दिवसांपासून लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. यातच भिवंडीतील इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अनिल थोरात व पालिकेचे डॉ जयवंत धुळे यांनी २० मे रोजी दिल्ली येथील मर्कज येथून आलेले भिवंडीचे नागरिक  आलतमश नुरुद्दीन शेख रा. बिस्मिला अपार्टमेंट मिलतनगर, तसेच शाबाज कमरूद्दीन अन्सारी यांना त्याच दिवशी विलगीकरण केंद्रात दाखल केले होते. मात्र त्याचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येण्याआगोदारच त्यांना राजकीय दबावपोटी कोरोना केंद्रातून डिस्चार्ज करण्यात आले होते. त्यांनतर हे दोन्ही इसम आपापल्या घरी गेले. ईद निमित्त ते अनेक लोकांना जाऊन भेटले. अनेक लोक त्यांच्या घरी आले. मात्र दुसऱ्या दिवशी या दोन्ही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची झोप उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केवळ आर्थिक फायद्यासाठी आणि  राजकीय दबावाला बळी पडून डॉ जयवंत धुळे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असून भिवंडीच्या नागरिकांचे जीव धोक्यात घातला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. याची माहिती मिळताच भिवंडी एमआयएमचे अध्यक्ष मो.खालिद गुड्डू यांनी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ प्रवीण अष्टीकर यांना निवेदन दिले आहे की डॉ जयवंत धुळे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच डॉ जयवंत धुळे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचे डॉ प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सध्या दोन्ही रुग्ण हे टाटा आमंत्रण येते विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहेत. तर भिवंडीत आजपर्यंत ३४५ रुग्ण आढळले आहेत.१५५ बरे झाले असून १४लोक मृत्यू पावले आहेत. याला ते डॉक्टर जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे  करण्यात आली आहे. दरम्यान पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते श्याम अग्रवाल यांनी क्वारंटाईनच्या नावाने भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णाची लूट होत असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून होम क्वारंटाईन करण्यासाठी हजारो रुपयांची लाच घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे