अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करा – आमदार प्रमोद पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण:ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची नोंद ठेऊन ते ज्याठिकाणी कामानिमित्त जात असतील त्याच ठिकाणी कुटुंबासहित सर्वांची निवासाची,खाण्या पिण्याची योग्य व्यवस्था करण्याची

 कल्याण: ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची नोंद ठेऊन ते ज्याठिकाणी कामानिमित्त जात असतील त्याच ठिकाणी कुटुंबासहित सर्वांची निवासाची,खाण्या पिण्याची योग्य व्यवस्था करण्याची किंवा या सर्व कर्मचाऱ्यांची येता जाता शहरांच्या वेशीवर किंवा ते राहत असतील त्याठिकाणी रोज आरोग्य तपासणी करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वच विभागात कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत. राज्यातील लॉकडाऊनला दिड महिना होत आला तरी कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत नाही. आता नवीन रुग्ण सापडत आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यामध्ये पोलीस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पत्रकार मित्र, बेस्ट वाहक-चालक असे कर्मचारी येतात. वास्तविक कोरोना विरुद्धच्या लढाईत या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक होते. हे कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी मुंबई, ठाणे व इतर विभागात नोकरीनिमित्त रोज ये जा करीत असतात आणि त्यांचा अनेक लोकांशी प्रत्यक्ष संबंध येत असतो. अशा एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास सर्व कुटुंबीय, राहत असलेला परिसर, सोसायटी संक्रमित होते आणि सर्वाना होम क्वारंटाइन करण्याची वेळ येते. अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यास दुर्दैवाने कोरोनासारख्या आजाराने गाठल्यास इतर कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य खचून महामारीला आळा घालण्याची लढाई कमजोर पडण्याची शक्यता आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना कारखानदारांसाठी काही निर्णय घेण्यात आले होते. उद्योग सुरू करायचा असल्यास कर्मचाऱ्यांची वाहतूक न करता त्याच ठिकाणी सर्व व्यवस्था करावी असा निर्णय घेण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांची नोंद ठेऊन त्यांची ते ज्या ठिकाणी कामानिमित्त जात असतील त्याच ठिकाणी कुटुंबासहित सर्वांची निवासाची,खाण्या पिण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे किंवा या सर्व कर्मचाऱ्यांची येता जाता शहरांच्या वेशीवर किंवा ते राहत असतील त्या ठिकाणी रोज आरोग्य तपासणी करावी, त्यासाठी तातडीने आरोग्य तपासणी केंद्र सुरू करावीत व नोंदणी कार्ड सर्व कर्मचाऱ्यांना देऊन त्याची तपासणी अनिवार्य करणे आवश्यक आहे. कारण या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळणे आपले सर्वांचेच कर्तव्य असून हे सुरक्षित राहिल्यास आपण सुरक्षित राहू शकतो. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यास ससेहोलपट झाल्याचाही घटना कानावर येत आहेत त्यासाठी पोलीस,कोरोना फायटर व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र कोविड -१९ रुग्णालय ठाणे जिल्ह्यामध्ये, असावे अशी मागणीही आमदार प्रमोद पाटील यांनी केली आहे.