कल्याण : कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे, नवीमुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर शहरांसाठी महत्वाचा असुन रोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या

 कल्याण : कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे, नवीमुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर शहरांसाठी महत्वाचा असुन रोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे असून गुणवत्ता तपासून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीकडे केली आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना याबाबत पत्र पाठवून आमदार पाटील यांनी ही मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सध्या रस्त्यावर खूप कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. अशावेळी कंत्राटदाराला काम जलदगतीने आणि दर्जेदार करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगत हे काम सुरू केल्यापासून कामाच्या दर्जाबाबत अनेक जणांच्या तक्रारी आणि व्हिडीओ येत आपल्याला प्राप्त होत आहेत. त्यामध्ये कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे आढळून आले असून असे काम सुरू असताना एमएसआरडीसीचे अधिकारीसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली. तर कामाच्या पद्धतीत एकसुत्रता, नियोजन दिसत नाही तसेच कामाची गुणवत्ता प्रथमदर्शी चांगली दिसत नाही त्यामुळे हा रस्ता लवकर नादुरुस्त होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या कामाची तातडीने दखल घेऊन कामाच्या दर्जाबाबत चौकशीचे आदेश द्यावेत आणि त्रयस्थ संस्थेमार्फत गुणवत्ता चाचणी केल्याशिवाय कंत्राटदाराला कामाचे बिल देऊ नये, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.