‘या’ उड्डाणपूलाच्या कामासाठी एमएमआरडीएने काढली निविदा

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ(bhivandi kalyan shil) मार्गाचे सध्या सहा पदरी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित आहेत. मात्र वाहतूक कोंडीतील अडथळे लक्षात घेता कल्याणफाटा व शीळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल(flyover) व कल्याण फाटा जंक्शन येथे भुयारी मार्ग करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. ही मागणी विचारात घेता त्याला मंजूरी मिळाली होती. या कामाची निविदा आज एमएमआरडीएने(mmrda) प्रसिद्ध केली आहे.

या कामाकरीता १९५ कोटी २४ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यासाठी एमएमआरडीने निविदा काढली आहे. त्यामुळे कंत्राटदार निश्चित करुन लवकर उड्डाणपूल व भुयारी जंक्शन मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे दोन्ही उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार झाल्यावर या परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास बहुतांश मदत होणार आहे. भिवंडी-कल्याण-शीळ हा मार्ग अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गे मुंब्रा बायपास मार्गे ठाणे, मुंबईला जाता येते. तसेच भिवंडी बायपासमार्गे ठाणे, मुंबई-नाशिक महामार्गावर पोहचता येते. त्याचबरोबर कल्याणहून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला जाता येते. नवी मुंबई पनवेल मार्गे पुढे गोवा महामार्गाला जाता येते. कल्याण, ठाणे, नवी मुंबईतील कारखान्यात व सरकारी तसेच खाजगी कंपन्यांत कार्यालयात काम करणाऱ्या चाकरमान्यांकरीता हा मार्ग महत्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कल्याणफाटा व शीळ फाटा जंक्शन येथील उड्डाणपूल व कल्याण फाटा येथील भुयारी मार्ग महत्वाची कामगिरी पार पाडणार आहे.

एमएमआरडीने निविदा प्रसिद्ध केल्याने खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे आभार व्यक्त करीत या कामाकरीता प्राप्त निविदापैकी योग्य तो कंत्राटदार लवकर निश्चित करण्याची कामगिरी लवकर पाड पाडावी. जेणेकरुन या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी अपेक्षा खासदार शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.