mns

नवी मुंबई शिक्षण विभागाचेबालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकाराकडे (RTE)दुर्लक्ष झाल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. तसेच ही प्रकिया सुलभ करून देण्याचे खासगी शाळांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.

  नवी मुंबई-: बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार(RTE) अधिनियमामध्ये दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित व कायम अनुदानित शाळामध्ये किमान २५% टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. मात्र नवी मुंबईतील काही मुजोर खाजगी शाळांनी शासनाच्या मोफत शिक्षण देण्याच्या योजनेला बगल दिली आहे.

  नवी मुंबई शिक्षण विभागाचेदेखील याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. तसेच ही प्रकिया सुलभ करून देण्याचे खासगी शाळांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.

  आरटीईसाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरताना नवी मुंबई मनपाच्या जुन्या वॉर्ड रचनेचाच संदर्भ दिसतो. त्यामुळेही पालकांचा गोंधळ उडतो. शक्य असल्यास पालिकेने राज्य सरकारला तसे कळवून नवीन वॉर्ड रचनेनुसार प्रक्रिया अद्ययावत करावी. आरटीईमधील २५% टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा प्रवेश प्रक्रिया व तत्सम माहिती मिळवण्यासाठी असलेले नवी मुंबई मनपा शिक्षण विभागाचे संकेतस्थळ मराठी भाषेत उपलब्ध नाही ते तातडीने मराठी भाषेत करून अद्ययावत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

  तसेच या योजनेची माहिती मिळावी यासाठी सर्व शाळांनी २५% प्रवेशाबाबतच्या माहितीचा फलक शाळेच्या दर्शनी भागात नागरिकांना सहज दिसेल अशा पद्धतीने लावावा. मात्र नवी मुंबई मधील एकाही खाजगी शाळेने असे फलक लावलेला नाही. त्यासंदर्भातही बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  पालिका हद्दीत योजनेबाबत भित्तीपत्रके/बँनर/फलक लावण्यात यावेत. त्यामध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रवेशाचे वेळापत्रक, मदतकेंद्रांची नावे तसेच शाळानिहाय इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक (नर्सरी) वर्गातील प्रवेश क्षमतेच्या २५% प्रवेशाअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या जागां संदर्भात सविस्तर माहिती असावी. शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर ही माहिती अपलोड करावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या समस्यांसाठी मदत व साह्य केंद्रांची स्थापना करावी. प्रशिक्षण देण्यात यावे. या सगळ्या मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्या आहेत. त्यासाठी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेतली.

  यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, निखिल गावडे,अप्पासाहेब कोठुळे, सनप्रीत तुर्मेकर, सागर नाईकरे, श्रेयस शिंदे, दशरथ सुरावसे, प्रशांत पाटेकर, समृद्ध भोपी, सुमित जाधव, शुभम इंगवले, प्रेम दुबे, निखील थोरात, ओमकार गंधे, विवेक शिंगोटे, सुरज निकम, सतीश पडघन, प्रमोद डेरे, धीरज शिंदे उपस्थित होते.