गोविंदा रे गोपाळा : अखेर मनसेने हंडी फोडलीच

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पहिली दहीहंडी फोडली आहे. मनसेने घेतलेल्या निर्णयानुसार निषेधाची पहिली हंडी ठाण्यातील वर्तकनगर येथे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फोडण्यात आली.

    कोरोना काळात फक्त हिंदुंच्याच सणालाच विरोध का? असा सवाल सध्या राज्यातील विरोधी पक्ष भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारण्यात येत आहे. त्याचाच निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पहिली दहीहंडी फोडली आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अजून पुर्णपणे कमी झालेला नाही. त्यातच तज्ज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर निर्बंध घालत हा उत्सव साजरा करण्यास मनाई केली. व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. ठाकरे सरकारने निर्बंध जाहिर करताच भाजप व मनसेने सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा निर्णय घेतला.

    मनसेने घेतलेल्या निर्णयानुसार निषेधाची पहिली हंडी ठाण्यातील वर्तकनगर येथे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फोडण्यात आली. गोविंदांनी हे निर्बंध झुगारत थर लावले व हंडी फोडुन मनसेचा झेंडा फडकवला. ठाण्यातील नौपाडा येथे मनसेचं मुख्य कार्यालय आहे येथे देखील मनसैनिकांनी थर रचत दहीहंडी फोडली आहे.

    दरम्यान, राज्य सरकारने पोलिसांद्वारे सोमवार दुपारपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हे ‘नोटीस सत्र’ आणि त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांना ‘अटक सत्र’ सुरू होते- आहे. पण तरीही “आम्ही दहीहंडी फोडून आमचा ‘साहसी’ उत्सव साजरा करणारच” असा ठाम निर्धार मुंबई-ठाण्यासह अनेक ठिकाणच्या महाराष्ट्र सैनिकांनी केला आहे.