कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुक्तीसाठी पुणे पॅटर्न राबवा – आमदार राजू पाटील यांचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

डोंबिवली - कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबई राज्यात आघाडीवर आहे. त्यातही कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या जवळपास १३७ पर्यंत पोहचली

 डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून जवळपास १३७ पर्यंत पोहचली आहे. अनेक हॉटस्पॉट तयार होत आहेत. आतापर्यंत विविध उपाययोजना करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. कोरोना रुग्ण संख्येमध्ये डोंबिवली राज्यात चौथ्या  नंबरवर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर लवकरात लवकर निर्णायक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्येही कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी व पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी खास उपाय-योजना करण्यात आली. अशीच काही उपाय-योजना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासाठी करावी, अशी मागणी आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्र पाठवून केली आहे.

आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, कल्याण डोंबिवलीमध्ये आरोग्य सेवांची आधीच दयनीय परिस्थिती असताना अचानक आलेल्या या संकटामुळे प्रशासनास कोरोनाला आळा घालण्यासाठी पाहिजे तसे यश येताना दिसत नाही.  त्यामुळे लॉककडाऊन असूनही रुग्ण संख्या कमी होत नसल्याने सध्या जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांसह नागरिकही हतबल झालेले दिसत आहेत. यावर लवकरात लवकर निर्णायक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्येही कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी व पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दिमतीला नवीन चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत शिफारस आपणाकडे केली होती. सदर प्रस्तावाला आपल्या कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. हे अधिकारी त्यांच्याजवळ असलेली मुळ जबाबदारी सांभाळून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार आहेत.  खरोखरच अत्यंत चांगला प्रयोग आहे. त्यामुळे राज्यातील इतर ज्या भागांमध्ये कोरोना बाधित संख्या वाढत आहे त्या ठिकाणी राबविण्यास हरकत नाही असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.