भरमसाठ वीजबिलांबाबत मनसेची महावितरणवर धडक

तर वीजबिल कमी करण्याचे महावितरणचे लेखी आश्वसन कल्याण : लॉकडाऊन काळात महावितरणने नागरिकांना भरमसाठ वीजबिलं पाठवली असून हि वीजबिलं भरायची कशी असा सवाल नागरिकांना पडला आहे. याबाबत कल्याण मधील

तर वीजबिल कमी करण्याचे महावितरणचे लेखी आश्वसन

कल्याण : लॉकडाऊन काळात महावितरणने नागरिकांना भरमसाठ वीजबिलं पाठवली असून हि वीजबिलं भरायची कशी असा सवाल नागरिकांना पडला आहे. याबाबत कल्याण मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश भोईर यांच्या नेत्तृत्वाखाली महावितरणच्या तेजश्री या कार्यालयावर धडक देत सुरु असलेल्या गलथान कारभाराचा जाब विचारला. तर ज्या नागरिकांना वाढीव वीज बिल आले आहेत ते कमी करून देण्याचे आश्वासन महावितरणने दिले आहे.

गेल्या तीन महिन्यापासून शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटामुळे टाळेबंदी जाहीर केली. यामुळे नागरिकांचे व्यवसाय व रोजगार बंद झाले आहेत. अशा वेळी विद्युत कर्मचार्यांनी मीटर रीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा दरमहा येणार्या बिलापेक्षा पाचपट जास्त बिल वितरित करण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेले नागरिक मेटाकुटीस आलेले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी मनसेने महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.

यावेळी मनसे पदाधिकार्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत सुरु असलेल्या गलथान कारभाराचा जाब विचारत नागरिकांची सद्धपरिस्थिती मांडली. तसेच ज्या नागरिकांना जास्त बिलं पाठवली आहेत ती त्वरित कमी करून देण्याची मागणी केली. बिल कमी न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेच्या या गंभीर इशाऱ्याची त्वरित दखल घेत महावितरणने वाढीव बिलं कमी करण्याचे लेखी आश्वासन दिले असून ज्या वीज ग्राहकांची बिलं चुकीची आहेत अशा ग्राहकांनी बिलावर मोबाईल नंबर लिहून संबंधित उपविभागीय कार्यालयात जमा करावी. याठिकाणी हि वीज बिले नियमानुसार दुरुस्त करण्यात येतील असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.