लॉकडाऊनचे तीनतेरा – मुंबई -नाशिक महामार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांची गर्दी, पायपीट करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय

भिवंडी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर दोन टप्प्यात लागू केलेल्या चाळीस दिवसांच्या लॉकडाऊननंतर १७ मे पर्यंत त्यामध्ये वाढ करण्यात आली. त्यातच मुंबई ठाणे परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या

भिवंडी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर दोन टप्प्यात लागू केलेल्या चाळीस दिवसांच्या लॉकडाऊननंतर १७ मे पर्यंत त्यामध्ये वाढ करण्यात आली. त्यातच मुंबई ठाणे परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक बनली असल्याने स्थलांतरीत मजूर कामगार यांचा धीर खचायला लागला आहे . शासन परराज्यात जाणाऱ्या कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन सोडल्या आहेत. पोलिसांकडे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यावर खाजगी वाहनांना ही प्रवासाची परवानगी देण्याची तयारी सुरू आहे. स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्या साठी प्रयत्न सुरू केले असतानाही कामगार मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाण्यास निघाले आहेत . मुंबई-नाशिक महामार्गावर असंख्य ट्रक, कंटेनर, बोलेरो टेम्पो, रिक्षा तर कोणी सायकलवरून आपल्या गावी जायला निघाले आहे. ज्यांना या वाहनांचे भाडे परवडत नाही, अशांनी आपली पायपीट रात्रीच्या अंधारात सुरूच ठेवली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील पडघा या परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनामध्ये माणसे जनावरांसारखी भरून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली आहेत. अत्यंत धोकादायक असा हा प्रवास करीत असताना ट्रक कंटेनर बोलोरो टेम्पो अशा वाहनांमध्ये दाटीवाटीने गर्दी करून ही माणसे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते . सुरुवातीच्या दोन टप्प्यात झालेल्या लॉकडाऊन काळात ट्रक कंटेनरमध्ये कमगारांना बसवून अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने त्याची थोडी भीती होती. परंतु मागील दोन दिवसांपासून ही सर्वच वाहन बिनदिक्कतपणे महामार्गावरून मार्गक्रमण करीत असताना तर कित्येक जण टेम्पोच्या मागे लटकून या धोकादायक प्रवासास निघाले होते. भिवंडी व्यतिरिक्त ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मुंब्रा, मीरा-भाईंदर या परिसरातील स्थलांतरीत कामगार असून शेकडो रिक्षा यासुद्धा काही कुटुंबांना घेऊन गावाकडे निघाल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावरील पडघा टोलनाका येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या . 
महामार्गावर वाहनांची गर्दी वाढलेली असताना या वाहनांमधून जीवघेणा धोकादायक प्रवास करण्याचे प्रवास भाडे साडेतीन हजार ते पाच हजार आकारले जात असल्याने तेवढे पैसे आता शिल्लक नसल्याने अनेकांची रात्रीच्या अंधारात महामार्गावरून पायी पायपीट सुरूच होती .ज्यामध्ये असंख्य महिला, लहान मुले तर एक महिला कडेवर दोन महिन्याचे तान्हुले घेऊन या प्रवासास निघाली होती. सरकार एकीकडे तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी  करण्याचे आदेश देत परराज्यात जाण्यासाठी पोलिसांनी ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय केली असताना भिवंडी शहरासोबत महामार्गावर शेकडो कामगार ट्रक टेम्पो मध्ये जनावरांसारखी भरून आपल्या गावाकडे निघाली असताना स्थलांतरीत कामगारांनी शासनाच्या तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊनचा विचका केला असून शासन पोलीस प्रशासन यांचे आता या लॉकडाऊनवर नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे .