Municipal Corporation to implement CM City Road Scheme in Thane It will help in developing undeveloped roads

मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तत्कालीन स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी या मुद्याला हात घातला. कोरोनाची सुरवात होण्यापूर्वी या संदर्भात महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली होती. त्यानुसार त्याला अनुमोदन देऊन तसा प्रस्तावही मंजूर झाला होता.

  • आराखडा तयार करण्याचे तात्काळ आदेश

ठाणे : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे ठाण्यातही राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री शहर सडक योजना राबविली जाणार आहे. त्यानुसार याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती संजय भोईर यांनी दिले. त्यानुसार या कामासाठी अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेमुळे ठाण्यातील दळण वळण व्यवस्था सुरळीत होणार असून रस्त्यांच्या कामांसाठी जो निधी अपुरा पडत आहे, त्यासाठी देखील शासनाकडून आता या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे.

मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तत्कालीन स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी या मुद्याला हात घातला. कोरोनाची सुरवात होण्यापूर्वी या संदर्भात महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली होती. त्यानुसार त्याला अनुमोदन देऊन तसा प्रस्तावही मंजूर झाला होता. परंतु त्या प्रस्तावाची अंमलबजावणी का झाली नाही? त्याचा आराखडा का तयार झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वास्तविक पाहता शहरातील रस्त्यांचे जाळे मोठे आहे, शहरातील मिसिंग लिकंही विकसित केल्या जात आहेत. परंतु तरी देखील रस्त्यांच्या विकासांसाठी महापालिकेचा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे आपणही प्रस्तावाची सूचना केली होती. परंतु प्रशासनाकडून अद्यापही त्यावर कोणतीच कार्यवाही का करण्यात आली नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या धोरणात देखील शहर सडक योजनेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार त्याचा फायदा ठाणे शहराला होणार असेल तर पालिकेकडून दुर्लक्ष का होत आहे, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान मुख्यमंत्री शहर सडक योजनेमुळे ठाण्यातील अविकसित असलेल्या रस्त्यांचा विकास होणार आहे. त्याचा फायदा दिव्यापासून ते थेट घोडबंदरच्या शेवटच्या टोकापर्यंत होणार आहे. त्यामुळे अशा अविकसित राहिलेल्या रस्त्यांचा तत्काळ आराखडा तयार करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यानुसार सभापती संजय भोईर यांनी देखील या संदर्भात प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत. आराखडा तयार करुन तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात यावा जेणेकरुन या रस्त्यांसाठी पालिकेला निधी उपलब्ध होऊन शहरातील रस्त्यांचे जाळे आणखीन मजबुत होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार या संदर्भात विकास ढोले या अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्यासाठी नियुक्ती निश्चित करण्यात येऊन रस्त्यांचा आराखडा तयार केला जाईल असा विश्वास नगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी व्यक्त केला.