पोटाच्या आगीने बदलली स्मशानाची व्याख्या – शिजले जेवण आणि उठल्या पंक्तीही..

मुरबाड: स्मशानभूमी- अंतिमसंस्कार करण्याचे अपवित्र, अपशकुनी आणि काळजात धडकी भरवणारे ठिकाण. या ठिकाणी अग्नी पेटतो तो फक्त आणि फक्त देहाची राख करण्यासाठी.गुरुवारी अशाच एका स्मशानात अग्नी

विशाल चंदने, मुरबाड : स्मशानभूमी म्हणजे अंत्यसंस्कार करण्याचे अपवित्र, काळजात धडकी भरवणारे ठिकाण. या ठिकाणी अग्नी पेटतो तो फक्त आणि फक्त देहाची राख करण्यासाठी. गुरुवारी अशाच एका स्मशानात अग्नी पेटला तो भयभीत, केविलवाण्या, भुकेल्या, असहाय आणि हतबल साठ जीवांच्या पोटाची आग विझविण्यासाठी. होय,  हे खरं आहे. ही घटना आहे मुरबाड तालुक्यातील देवपे गावातील.

कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊनचे पाश तोडत मिळेल त्या वाटेने जो तो गाव शोधीत निघालेला आहे. असाच एक पायपीट करत, भुकेने, पाण्याने कासावीस झालेला आणि थकलेला तांडा बदलापूरमार्गे मुरबाडच्या दिशेने येत होता. ही माहिती देवपे गावातील पंचायत समिती गट नेते श्रीकांत धुमाळ यांना मिळाली. हा थकलेला तांडा त्यांच्या  नजरेस पडला. लागलीच त्यांनी त्यांचे सहकारी तुषार कथोरे व मित्रमंडळीला याची कल्पना दिली. गावात या स्थलांतरीतांना प्रवेश देऊन त्यांची जेवणाची सोय करण्याचा या मंडळींनी विचार केला.  मात्र या स्थलांतरितांना गावात प्रवेश देण्यावरुन वाद नको. तसेच कोरोनाबाबतीत जोखीमही नको म्हणुन या टीमने शक्कल लढवत या सर्व स्थलांतरितांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावच्या स्मशानात आसरा दिला. तात्काळ स्मशानाची साफसफाई करून या ठिकाणी चूल रचली गेली. जेवण बनवले गेले आणि स्मशानभूमीच्या सावलीतच पार पडला हा अग्नीसोहळा. भुकेलेल्या या ६० मजुरांनी तसेच मदतकार्य करणाऱ्यांनी  याच ठिकाणी अन्न ग्रहण केले. यानिमित्ताने पोटाच्या आगीने स्मशानाची व्याख्याही बदलून गेली.