मुरबाड तालुका कोरोनामुक्त, मजुरांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे मुरबाडकर चिंतेत

मुरबाड - मुरबाड तालुका सध्या कोरोनामुक्त आहे. पण आसाल तेथेच थांबा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही रायगड, मुंबईतील मजुरांचे लोंढे रोजच्या रोज मुरबाडमध्ये दाखल होत असल्याने जिल्हा, तालुका

मुरबाड – मुरबाड तालुका सध्या कोरोनामुक्त आहे. पण आसाल तेथेच थांबा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही रायगड, मुंबईतील मजुरांचे लोंढे रोजच्या रोज मुरबाडमध्ये दाखल होत असल्याने जिल्हा, तालुका सीमा बंदीचा बोजवारा तर उडालाच आहे, पण या लोंढ्यांमुळे मुरबाडकर भयभीत झाले आहेत. जिल्हा, तालुका सीमाबंदी असतांना हे लोंढे शहरातून मुरबाडकडे येतातच कसे असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असुन याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी मुरबाडमध्ये होतेय.

सर्वत्र लॉकडाऊन आणि जिल्हा, तालुका सीमाबंदी असुन संचारबंदीही आहे. लॉकडाऊन काळात मुरबाडमध्ये अडकलेल्या परभणी, बुलढाणा येथील मजुरांची अनुक्रमे तळवली आश्रमशाळेने व मुरबाड नगरपंचायतीने सोय केली आहे. या मजुरांना शिवथाळी भोजन मिळणे अपेक्षित असतांना एका धाब्यावाल्याची सोय म्हणुन हे भोजन दिवसातुन एक वेळा स्थानिक रहिवाशांना पुरवले जात आहे. काही दानशूर व्यक्ती आणि संस्था मदतकार्यात पुढे येत असतांना तहसील प्रशासन मात्र ढिम्म आहे. तहसील प्रशासनाने लॉकडाऊन काळात लोकांची नेमकी सोय काय केली आहे,  हा एक फार मोठ्या संशोधनाचा विषय आहे. याच रामभरोसे कारभारामुळे मधल्या काळात कडक लॉकडाऊन असूनही काही मजूर बेपत्ता झाले.

सध्या मुरबाड तालुका कोरोनामुक्त आहे.मात्र आता रायगड, अंबरनाथ, बदलापूर या कोरोनाग्रस्त भागातून रोजच्या रोज मजुरांचे लोंढे मुरबाडकडे येत आहेत, त्यामुळे मुरबाडकर या नव्या पाहुण्यांमुळे भीतीच्या सावटाखाली आहेत. असेच काही नुकतेच नव्याने आलेले मजुर येथील कुणबी भवनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाल्याने संभाजी नगरमधील रहिवासी संतापले होते. 

जिल्हा, तालुका सीमाबंदी असतांना, शिवाय ठिकठिकाणी पोलिस चौक्या आहेत. एकट्या व्यक्तीला मुरबाडमध्ये घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असतांना तीस चाळीसच्या संख्येच्या झुंडीत हे मजुर शहरी भागातून मुरबाडपर्यंत पोहचतात तरी कसे, असा सवाल मुरबाडकर करत आहेत. हे लोंढे असेच वाढत राहिले तर मुरबाड नगरपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासन आणि सामजिक संस्था यांना या लोंढ्यांचे नियोजन करणे अवघड होईल, त्यामुळे या प्रकाराची ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी मुरबाडवासीय करत आहेत.