nmmc commisioner abhijit banger

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने(navi mumbai corporation) कोविड संदर्भात विविध उपययोजना करत कोविड संक्रमणाला थोपवून धरले आहे. आयुक्त अभिजीत बांगर(abhijit banger) यांनीदेखील पालिकेचा कारभार हातात घेताच मृत्यूदर कमी करण्यावर भर देत प्राथमिक अवस्थेत रुग्णांना कसे उपचार मिळतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने(navi mumbai corporation) कोविड संदर्भात विविध उपययोजना करत कोविड संक्रमणाला थोपवून धरले आहे. आयुक्त अभिजीत बांगर(abhijit banger) यांनीदेखील पालिकेचा कारभार हातात घेताच मृत्यूदर कमी करण्यावर भर देत प्राथमिक अवस्थेत रुग्णांना कसे उपचार मिळतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. याही पुढे जाऊन संकटकाळात नागरिकांशी संवाद साधत भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्याचा उपक्रम आयुक्तांनी सुरु केला असतानाच आता नव्याने आयुक्तांकडून कोविड सेंटरमधील रुग्णांशी आयुक्त थेट संवाद साधत आहेत. आयुक्तांच्या दिलासादायक शब्दांनी कोविड रुग्णांना आधार मिळू लागला असून याचे सकरात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत.

नवी मुंबईत कोविड रुग्णांची संख्या ४३ हजारांपर्यंत पोहोचली आहे. तर एकूण ८६६ मृत्यू झाले आहेत. पालिकेचा रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला असून १२७ दिवसांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर खाली उतरून २.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाला सुरुवात होताच मुंबई, पुणे, व ठाणे महापालिकेनंतर नवी मुंबई शहरावर राज्याचे लक्ष होते. विविध ठिकाणी युद्धपातळीवर कोविड सेंटर उभे करून रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाही व पालिकेचे त्यावर लक्ष राहील यासाठी तत्कालीन विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांनी तत्परता दाखवली आहे. त्यातील सुविधांकडे देखील काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. कोविड सेंटर उभारल्यावर अनेक सेंटरमधून कोविड रुग्णांच्या तक्रारी येत होत्या. रुग्णांचे नातेवाईकही काळजीपोटी पालिकेकडे सातत्याने तक्रार करत होते. जेवण वेळेवर न मिळणे, जेवणाचा दर्जा, स्वछता, गरम पाणी उपलब्ध न होणे क्वचित प्रसंगी डॉक्टर्स व नर्सेसकडून लक्ष दिले न जाणे अशा विविध तक्रारी पालिकेला येत असल्याचे दिसून येत होते. ही बाब ओळखत आयुक्त अभिजित बांगर यांनी थेट रुग्णांशी संवाद साधण्यास सुरू केले आहे.

दिवसभरात पालिकेच्या कोणत्याही कोविड सेंटरमधील कोणत्याही रुग्णास आयुक्त फोन करत आहेत. त्यांच्याकडून कोविड सेंटरमध्ये त्यांना जाणवणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. जेवण वेळेवर दिले जाते का? जेवणाचा दर्जा, औषधे वेळेवर दिली जातात का? स्वच्छतेच्या बाबतीत काही असुविधा आहेत का? असल्यास कोणत्या? त्याबाबत काही तक्रारी केल्या आहेत की? त्यात सुधारणा झाली आहे का? यासह विविध बाबू थेट रुग्णांनाकडून जाणून घेतल्या जात आहेत. काही क्षुल्लक तक्रारींवर तातडीने तोडगा काढून सुधारणा केल्या जात आहेत. आयुक्तांनी आदेश दिल्यावर त्याची त्वरित अंमलबजावणी केली जात आहे.त्यामुळे आयुक्तांच्या या उपक्रमाने मेडिकल व परमेडिकल स्टाफवर जरब बसली आहे. तर आयुक्तांच्या दिलासादायक शब्दांनी रुग्णांना धीर मिळत आहे.

कोविड सेंटरमधील वाढत्या तक्रारी लक्षात घेत कोणत्याही कोविड सेंटरमधील रुग्णाला फोन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यास मदत होत आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत असून पालिकेकडून रुग्णांची हेळसांड होणार नाही याकडे लक्ष देत आहोत. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदेखील वचक राहणार आहे. ज्या तक्रारी आहेत त्या लागलीच सोडवल्या जात आहेत.

- अभिजीत बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्त