नवी मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये आढळले ११४ कोरोना रुग्ण

नवी मुंबई : कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच आजचा पुन्हा एकदा नवी मुंबईकरांची चिंतेत आणखी भर पडली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या

 नवी मुंबई : कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच आजचा पुन्हा एकदा नवी मुंबईकरांची चिंतेत आणखी भर पडली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ११४ कोरोना रूग्ण नवी मुंबई शहरात आढळले आहेत. याआधी ११ मे रोजी कोरोनाच्या आकडेवारीने शतकी मजल मारताना १०५ आकडेवारी गाठली होती.

नवी मुंबई शहरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. आरोग्य विभागात कामासाठी आणलेल्या परिवहनच्या तिकिट तपासनीसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसापूर्वीच महापालिका मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या आरोग्य विभागातील दोन क्रमाकांच्या वरिष्ठ डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच रसायनी येथील इंडियन बुल्स येथे महापालिकेने निर्माण केलेल्या क्वारंटाईन सेंटर हे कोरोनाग्रस्तांच्या सुविधाऐवजी तेथील असुविधांनीच अधिक वादग्रस्त बनले. उपचारासाठी तेथे आणलेल्या नवी मुंबईकरांना तेथे आंदोलन करण्याची वेळ आली.

आज आढळलेल्या ११४ कोरोना रूग्णांमध्ये बेलापूर विभागात १५, नेरुळ विभागात २२, वाशी विभागात १४, तुर्भे विभागात ४१, कोपरखैराणे विभागात १५, घणसोली विभागात ४, ऐरोली विभागात कोरोनाचे २ तर दिघा विभागात कोरोनाचा एक रूग्ण आढळले आहेत. या कालावधीत महापालिका प्रशासनात कायम सेवेत काम करणाऱ्या एका वाहनचालकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. ११ मेनंतर पुन्हा कोरोनाची आकडेवारी शंभरीपार गेलेली आहे.