नवी मुंबई पालिका राबवणार दत्तक रस्ते योजना, स्वच्छतेसाठी राहणार दत्तक घेणाऱ्यांची नजर

नवी मुंबई (Navi Mumbai)हे एकविसाव्या शतकातील शहर असले तरी शहरात सध्या बजबजपुरी वाढत आहे. सिडकोने बांधलेले रस्ते वाढत्या लोकसंख्येने अपुरे पडलेले आहेत. त्यात नवी मुंबईला आपली कर्मभूमी मानत मुंबईतील गोवंडी, चेंबूर, मानखुर्द,ठाण्यातून फेरीवाले शहरात व्यवसायासाठी येऊ लागले आहेत.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने(Navi Mumbai) १५ ऑगस्टपासूनच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ची तयारी सुरू केली आहे. नुकतेच गांधी जयंतीनिमित्त(Gandhi Jayanti) आयुक्त बांगर यांनी शहर स्वच्छतेसाठी अनेक नवनव्या योजना आणल्या आहेत.  त्यानुसार ‘दत्तक रस्ते योजना’(Road Adoption Scheme In Navi Mumbai) हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानुसार शहरातील विभागनिहाय १० रस्ते दत्तक देखील दिले गेले आहेत. संबंधित व्यक्ती, संस्था, सोसायटी वा व्यवसायिकांना रोजच्या स्वच्छतेच्या बाबतीत निरीक्षकाची भूमिका निभवावी लागणार आहे.

  नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातील शहर असले तरी शहरात सध्या बजबजपुरी वाढत आहे. सिडकोने बांधलेले रस्ते वाढत्या लोकसंख्येने अपुरे पडलेले आहेत. त्यात नवी मुंबईला आपली कर्मभूमी मानत मुंबईतील गोवंडी, चेंबूर, मानखुर्द,ठाण्यातून फेरीवाले शहरात व्यवसायासाठी येऊ लागले आहेत. शहरात राहणारे फेरीवालेच डोईजड होत असताना बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांमुळे शहरातील रस्ते दुतर्फा भरलेले पाहण्यास मिळत आहेत. त्यासह लोकसंख्येसोबत वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते दुतर्फा भरून वाहू लागले आहेत त्यामुळे एकाचवेळी शहरात अरुंद रस्ते व त्यात फेरीवाले व पार्क केलेली वाहने असे चित्र दिसून येत आहे. फेरीवाल्यांमुळे शहरातील पदपथ देखील व्यापले जात असून नागरिकांना चालण्यास जागा उरलेली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग फेरीवाले हटवण्यासाठी कुचकामी ठरत आहे. तर अद्याप पालिकेचे फेरीवाला धोरण हे कागदारावरच असल्याने नवी मुंबईत फेरीवाले उतू जाऊ लागल्याचे चित्र आहे.

  नवी मुंबई पालिकेने २०२२ च्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी कंबर कसली आहे. रस्ते व पदपथ स्वच्छ तर शहर स्वच्छ या उक्तीनुसार रस्ते दत्तक योजना राबवली जाणार आहे. त्यानुसार कोणीही १०० मी. पर्यंतचा रस्ता दत्तक घेऊ शकतात. त्याच्या स्वच्छतेवर संबंधितांना लक्ष ठेवावे लागणार आहे. मग फेरीवाल्यांकडून जरी त्या ठिकाणी अस्वच्छता पसरवली जात असल्यास त्याबाबत त्या विभागातील अधिकाऱ्यास कळवावे लागणार आहे त्यावर तातडीने अंमलबजावणी केली जाणार असून शहर स्वच्छतेसाठी ही योजना फलदायी ठरेल.

  -डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त - घनकचरा विभाग, नवी मुंबई पालिका

  फेरीवाले व हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडून परिसर अस्वच्छ होत असल्याने सकाळी रस्ते चकाचक करणाऱ्या सफाई मित्रांची मेहनत वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून वारंवार रस्ते व पदपथ फेरीवलामुक्त करावेत अशी मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने आणलेली दत्तक रस्ते योजना ही रस्ते व पदपथ स्वच्छ व फेरीवाला मुक्ततेसाठी उत्तम उपाय ठरू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  यापुढे अतिक्रमण विभाग विरुद्ध घनकचरा विभाग
  शहरात फेरीवाल्यांची संख्या काबूत न राहण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यासोबत अतिक्रमण विभाग कारणीभूत असल्याची टीका कायम केली जाते. शहरातील सर्वाधिक मोठी समस्या ही फेरीवाले, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे व वाहने पार्किंग ही बनलेली आहे. फेरीवाले व उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना हटवणे हे अतिक्रमण विभागाचे काम आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे फेरीवाले फोफावत चालले असल्याची टीका कायम होते. कोविड काळात आयुक्तांनी आरोग्य व्यवस्था सक्षमपणे हाताळताना स्वच्छ सर्वेक्षणात देखील कौतुकास्पद पाऊले उचलली नवी मुंबईकरांनी पाहिली आहेत. मात्र अद्यापही रस्ते व पदपथ मोकळे, फेरीवाला मुक्त करण्यात मात्र आयुक्त बांगर यांना अपयश आले आहे. त्यामुळे अद्यापही नागरिक तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची आठवण काढतात. त्यामुळे दत्तक रस्ते योजना ही एकप्रकारे अतिक्रमण विभागाला कात्रीत पकडणारी व भ्रष्टाचार कमी करण्याची योजना  आहे का असा संभ्रम यातून व्यक्त होत आहे. यापुढे रस्ते दत्तक योजनेत दत्तक घेतलेल्या संबंधितांनी रस्ते अस्वच्छ असल्यास, फेरीवाले बसलेले असल्यास किंवा खाद्यपदार्थ गाडीचालकाकडून परिसर अस्वच्छ केला जात असल्यास, अनधिकृत बॅनरबाजी करून परिसर विद्रुप केलेला असल्यास, अथवा हॉटेल व्यवसायिकांकडून वा दुकानदारांकडून अस्वच्छता  पसरवली जात असल्यास त्याबाबत तातडीने स्वच्छता विभाग अधिकाऱ्यांना त्याबाबत कळवले जाणार आहे. तिथून हा धागा पुन्हा अतिक्रमण विभागाला जोडला जाणार असल्याने अतिक्रमण विभागाला अनधिकृत बाबींवर कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे  अतिक्रमण विभाग विरुद्ध घनकचरा विभाग असे द्वंद्व उभे राहणार आहे.

  अशी असू शकते दत्तक रस्ते योजना

  • १०० मी. पर्यंत रस्ता दत्तक देण्यात येणार.
  • त्या भागात राहणारी व्यक्ती, सामाजिक संस्था, सोसायटी अथवा व्यवसायिकांना
   रस्ता दत्तक घेता येणार.
  • रस्ता दत्तक घेतल्याचे कसलेही मूल्य संबंधितांना पालिकेला द्यावे लागणार नाही.
  • एक प्रकारे परिसराचा व रस्त्याचा निरीक्षक बनावे लागणार आहे.
  • संबंधितांच्या नावाचा फलक त्या रस्त्यावर लावला जाणार
  • त्या त्या विभागातील स्वच्छता अधिकऱ्यांचे नंबर संबंधित व्यक्तीकडे दिले जाणार.
  • दत्तक घेतलेल्या संबंधितांनी त्या रस्त्याची स्वच्छता व्यवस्थित होते की नाही, रस्त्यावर अस्वच्छता पसरल्यास तातडीने फोटो स्वच्छता अधिकाऱ्याकडे पाठवले जाणार. तातडीने त्यात अंमलबजावणी केली जाणार