kho kho players

नवी मुंबई महापालिकेच्या शूटिंग बॉल संघाने १३,  खो खो संघाने  ३, कबड्डीच्या संघाने  १ विजेते व उपविजेतेपद पटकावून नवी मुंबई महापालिकेचे नाव राज्यात व देशभर पसरवले आहे. २०१९-२०साल हे या तिन्ही संघांसाठी सुवर्णमयी ठरलेले असताना, २०२०-२१ वर्ष मात्र काहीसे चिंता वाढवणारे ठरत आहे. या वर्षात कोरोनामुळे  सर्व काही थांबलेले असल्याने या खेळाडूंचे पालिकेकडून केले जाणारे करार नूतनीकरण(contract renovation is pending)  अद्याप झालेले नाही.

सिद्धेश प्रधान, नवी मुंबई:  नवी मुंबई महापालिकेने(navi mumbai corporation) खो-खो, शुटिंगबॉल व कबड्डीचे व्यावसायिक संघ तयार केले आहेत. २०१८-१९ साली या तिन्ही खेळांचे संघ अस्तित्वात येऊन राज्यभरात या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शूटिंग बॉल संघाने १३,  खो खो संघाने  ३, कबड्डीच्या संघाने  १ विजेते व उपविजेतेपद पटकावून नवी मुंबई महापालिकेचे नाव राज्यात व देशभर पसरवले आहे. २०१९-२०साल हे या तिन्ही संघांसाठी सुवर्णमयी ठरलेले असताना, २०२०-२१ वर्ष मात्र काहीसे चिंता वाढवणारे ठरत आहे. या वर्षात कोरोनामुळे  सर्व काही थांबलेले असल्याने या खेळाडूंचे पालिकेकडून केले जाणारे करार नूतनीकरण(contract renovation is pending)  अद्याप झालेले नाही.

चांगली कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंच्या करार नुतनीकरणाची फाईल गेले तीन महिने होऊनही रेंगाळली आहे. पालिकेच्या या संथ कारभाराचा फटका खेळाडूंना बसण्याची शक्यता आहे. येत्या काळात व्यवसायिक स्पर्धा  होण्याच्या मार्गावर असताना करार नूतनीकरणाअभावी संघ स्पर्धेत भाग घेणार की नाही याची चिंता खेळाडूंना भेडसावू लागली आहे.

नवी मुंबई महापालिकेने खेळाडूंना वाव मिळावा यासाठी पाऊले उचलत महापालिकेचा व्यवसायिक संघ सुरू करण्याची घोषणा २०१९-२० साली केली. ती अंमलात देखील आणली.  मैदानी चाचणी घेत खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यानुसार शूटिंग बॉल १०, कबड्डी १२ व खो-खोसाठी १२ असे एकूण ३४ खेळाडू निवडण्यात आले होते.या खेळाडूंना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन देण्याचे पालिकेने ठरवले होते. त्यानुसार संघ तयार झाले होते. २०२०-२१ वर्ष हे या तिन्ही संघांनी गाजवत नवी मुंबई महापालिकेचा दबदबा संपूर्ण राज्यात व देशात तयार होता. २०२०-२१ सालात कोरोनाने प्रत्येकाचेच कंबरडे मोडले आहे. सध्या कोरोनाचा आलेख उतरू लागलेला असताना खेळाडू देखील आपल्या सरावाला लागले आहेत. जगातील क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असताना देशांतर्गत व राज्यांतर्गत क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आयोजक सरसावले आहेत.

शूटिंग बॉलची व्यवसायिक स्पर्धा जाहीर झाली आहे. तर खो खो व कबड्डीच्या व्यवसायिक स्पर्धांचे देखील आयोजन कधीही होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे व्यवसायिक क्रीडा स्मर्धांचे आमंत्रण आल्यास ते स्वीकारायचे की नाही ?  याबाबत प्रशिक्षक देखील साशंक आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने नवी मुंबई महापालिकेने देखील शहराच्या विकसकामांचा वेग वाढवला आहे. मुख्यालयात वेगवान पाऊले उचलून विकसकामांना मान्यता देण्यात येत आहे. मात्र अद्याप या तीन प्रकारांतील ३४ खेळाडू व प्रशिक्षकांच्या करार नुतनीकरणाबाबत पालिकेकडून संथ हालचाली सुरू आहेत. तीन महिन्यांपूर्वी तयार केलेली करार नूतनीकरणाची फाईल तशीच पडून आहे.  मुख्य म्हणजे नवी मुंबई महापालिकेचा कित्ता गिरवत ठाणे महापालिकेने देखील व्यवसायिक क्रीडा संघ तयार केले आहेत.

गरजू खेळाडूंना आर्थिक आधार

खो-खो, कबड्डी व शूटिंग बॉलसाठी खेळणारे खेळाडू हे गरजू व गरीब घरांतील असतात. त्यामुळे  पालिकेने व्यवसायिक संघ तयार करून मानधन सुरू केल्याने अनेक गरजू खेळाडूंच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत होत आहे. हल्ली मातीतले खेळ लुप्त होत असताना विविध कंपन्यांनी क्रीडा संघ  सुरू केले आहेत.  मिळणाऱ्या संधी व मानधनामुळे खेळाडू बिनदिक्कतपणे आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळत जिवतोड मेहनत करत आहेत. मात्र करार नूतनीकरण न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेले खेळाडू पालिकेकडे डोळे लावून बसले आहेत.

देश व राज्यभरात नवी मुंबई पालिकेच्या संघांचा दबदबा

शूटिंग बॉल संघाने तर वर्षभरात तब्बल १३ व्यवसायिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. खो खो संघाने देखील मातब्बर अशा पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मुंबई पोलीस, बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक, महावितरण अशा  संघांना धूळ चारत नवी मुंबई महापालिकेचे नाव खो खो क्षेत्रात उंचावले आहे. कबड्डी संघाचा देखील दबदबा कायम आहे. त्यामुळे येत्या व्यवसायिक अखिल भारतीय स्पर्धांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या संघाकडे आदराने पाहिले जात असून मैदानात उतरताच प्रतिस्पर्धी संघाचा थरकाप उडत आहे.

विरोधी संघांकडून नवी मुंबई महापालिकेच्या संघाच्या प्रत्येक खेळाडूंच्या डावपेचावर विशेष लक्ष ठेवून संघाची व्यूहरचना आखली जात आहे. तर नवी मुंबई महापालिकेचे संघ खेळताना प्रेक्षकांकडूनदेखील उदंड प्रतिसाद मिळत आहे.

मानधनासाठी ९० लाखांची तरतूद

प्रत्येक वर्षी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रत्येक खेळाडूला १५ हजार तर मुख्य प्रशिक्षकांना २० हजार व सह प्रशिक्षकांना १५ हजार व मैदान संभाळणाऱ्यांना १० हजार रूपये मानधन देण्यात येत आहे. खेळाडूंसाठी लागणारे क्रीडा साहित्य व त्यांच्या कपड्यांसाठीची तरतूद यात करण्यात आली आहे.

खेळाडूंच्या भविष्याबत नवी मुंबई पालिका गांभीर्याने विचार करत आहे. तिन्ही व्यवसायिक संघांचे करार नुतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच या करारांचे नूतनीकरण करण्यात येऊन खेळाडूंना दिलासा मिळेल.

- संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महापालिका