३ महिन्यांच्या कालावधीत नविन पूल बांधला जाणार  – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली : डोंबिवली पूर्वे आणि पश्चिमेतील लोकांना ये-जा करण्यासाठी रेल्वेवरील कोपर पूल अत्यंत महत्वाचा आहे. मात्र वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तो काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला. कल्याण डोंबिवली

डोंबिवली : डोंबिवली पूर्वे आणि पश्चिमेतील लोकांना ये-जा करण्यासाठी रेल्वेवरील कोपर पूल अत्यंत महत्वाचा आहे. मात्र वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तो काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे हा नविन पूल बांधण्यात येणार असून आजपासून त्याचे काम सुरू करण्यात आले. सर्वप्रथम पुढील १५ दिवसांत हा जुना पूल इथून हटवण्यात येणार असून त्यानंतर पुढील सुमारे ३ महिन्यांच्या कालावधीत नविन पूल बांधला जाणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

हा पूल बांधण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ३ वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतू त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पुन्हा ही प्रक्रिया राबवली आणि आपल्या अधिकारात अखेर रेल्वेच्या कंत्राटदाराला हे काम देण्याचा निर्णय घेतला. डोंबिवलीकर नागरिकांना होणारी गैरसोय पाहता महापालिका आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी या कामासाठी अत्यंत तत्परतेने सूत्रं हलवल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या कामाला सुरुवात झाल्याचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कल्याणातील पत्रीपुलाचे कामही सुरू करण्यात आले असून आता डोंबिवलीतील कोपर पुलाचे कामही आता सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत कल्याण आणि डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता सदर पुलाचे बांधकाम तातडीची बाब म्हणून पालिका आयुक्तांनी त्यांच्या विशेषाधिकारात म्हणजेच कलम ६७ क अन्वये करावे ही सातत्याने मी मागणी करत होतो. 

१० फेब्रुवारी २०२०  रोजी कडोंमपा आयुक्तांना तसेच २ मार्च २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या पत्राद्वारे मी सतत पाठपुरावा करीत होतो. माझ्या मागणीप्रमाणे अखेर आज कोपर पुलाचे बांधकाम याच कलम ६७ क अन्वये पालिकेने सुरु केले. देर आए दुरुस्त आए असंच म्हणावे लागेल. पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून डोंबिवलीकरांना दिलासा द्यावा ही पुन्हा एकदा मा आयुक्तांना विनंती करत आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.