ranjanoli bridge inaugaration

नवीन दुर्गाडी पुलाच्या(Durgadi Bridge) २ लेनचे आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या(Ranjanoli Flyover) ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण सोमवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

  ठाणे : कल्याणहून भिवंडी, ठाणे आणि विशेषतः मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या नवीन दुर्गाडी पुलाच्या(Durgadi Bridge) २ लेनचे आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या(Ranjanoli Flyover) ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण सोमवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

  या पुलामुळे कल्याण आणि भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत दुपारी ई लोकार्पण झाल्यानंतर शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह या दोन्ही पुलांचे लोकार्पण प्रत्यक्ष जागेवर येऊन केले.

  कल्याण शहराला जोडणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीवर बांधण्यात आलेल्या चार मार्गिकांच्या पुलापैकी पहिल्या दोन मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. पत्रीपुलाचे काम आणि गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर दुर्गाडी पुलापाशी वाहतूक वाढल्याने वाहतूककोंडी होऊ लागली होती. या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरूनच दोन्ही मार्गिका सुरू होत्या. अशात या नवीन पुलाच्या दोन मार्गिका सुरू झाल्याने शहराला वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन पुलामुळे जुन्या पुलावरून येणे आणि नव्या पुलावरून जाणे शक्य होणार असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

  कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील हजारो नागरिकांची याच पुलाचा वापर करीत आहेत. मात्र अस्तित्वात असणारा पूल सध्याच्या वाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्याने ६ वर्षांपूर्वी नव्या पुलाचे काम सुरू झाले होते. मात्र असंख्य अडचणींवर मात करत अखेर आज हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या हजारो नागरिकांची आता वाहतुक कोंडीच्या विळख्यातून  सुटका होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गाडी पुलाचे काम सुरू होते.

  जुना पूल बंद झाल्याने एकाच पुलावर वाहतूक आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास आणि सहन करावा लागत होता. आज यापैकी नवीन २ लेनचे उद्घाटन झाले असून उरलेल्या ४ लेनचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना ६ नविन आणि २ जुन्या अशा ८ लेन नागरिकांना वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

  मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिकवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजणोली उड्डाणपुलावरील दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्यामुळे भिवंडी जंक्शनपाशी होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. त्याचा फायदा या महामार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या छोट्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात होणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.