ग्लोबल हब कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, थेट कंपन्यांकडून महापालिकेने लस खरेदी करावी – निरंजन डावखरे

ग्लोबल हब हॉस्पिटलमध्ये(global hub hospital) रुग्णाला दीड लाख रुपये घेऊन प्रवेश दिल्याप्रकरणी ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीकडील सर्व कामे काढून घेऊन कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे(niranjan davkhare) यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा(vipin sharma) यांच्याकडे आज केली.

  ठाणे: ग्लोबल हब हॉस्पिटलमध्ये(global hub hospital) रुग्णाला दीड लाख रुपये घेऊन प्रवेश दिल्याप्रकरणी ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीकडील सर्व कामे काढून घेऊन कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे(niranjan davkhare) यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा(vipin sharma) यांच्याकडे आज केली.

  तसेच येत्या १ मेपासून सर्व नागरिकांसाठी खुल्या होणाऱ्या कोविड लसीकरण मोहिमेतील गर्दीबाबत नियोजन करावे, थेट कोविड लस उत्पादक कंपनीकडून ठाणेकरांसाठी लस खरेदी करण्याबाबत विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली. महापालिकेने ठाण्यात उभारलेल्या सात हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाची कंत्राटे ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. या एकाच कंपनीकडे सोपविली आहेत.

  या कंपनीला रुग्ण नसतानाही २५ टक्के रक्कम देण्याची हमी देण्यात आली. मात्र, या कंपनीने वैद्यकीय उपचाराचा अनुभव नसलेल्या एका बीएएमएस डॉक्टरलाच वैद्यकीय प्रमुख म्हणून नेमले होते. या संदर्भात भाजपाने २८ डिसेंबर २०२० रोजी पाठविलेल्या पत्रात कंपनीची धक्कादायक वस्तूस्थिती मांडली होती. त्यानंतर ओम साई कंपनीचे मेडिकल व फायनान्शियल ऑडिट करावे, रुग्ण नसतानाही २५ टक्के रक्कम देण्याच्या कराराचा फेरविचार करावा आदी मागण्या २८ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्राद्वारे आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या.

  मात्र या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ओम साई कंपनीच्या कंत्राटदाराला पाठबळ मिळाले. त्यातूनच तब्बल दीड लाख रुपये घेऊन रुग्णाला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची घटना घडली, असा आरोप आमदार डावखरे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

  महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली. तत्पूर्वी कोविडच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या खरेदीत गैरव्यवहार होत असल्याबाबतही भाजपाने लक्ष वेधले होते. मात्र, दुर्दैवाने त्याबाबत महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातून हलगर्जी झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

  या प्रकरणी कंत्राटदार ओम साई यांच्याकडील सर्व कामे काढून घेऊन सखोल चौकशी करावी. तसेच कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून आतापर्यंत अदा न केलेले बिल रोखून धरावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांचीही उपस्थिती होती.

  १ मेपासून गर्दीचे नियोजन आवश्यक

  येत्या १ मेपासून लसीकरणासाठी गर्दी उसळण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कमीत कमी त्रासात लस सहजपणे उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. तसेच मोठ्या गृहसंस्थांच्या क्लब हाऊसमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचा विचार करावा, अशी सुचनाही आमदार डावखरे यांनी केली आहे.

  थेट कंपनीकडून महापालिकेने लसखरेदी करावी – निरंजन डावखरे

  कोविड लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून थेट लस खरेदीची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने थेट उत्पादकांकडून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. काही खासगी आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ५०० हून नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, मोठ्या गृहनिर्माण संस्थांबरोबर संपर्क साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही थेट उत्पादक कंपन्यांकडून लस खरेदी करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्यातून महापालिकेला जादा लससाठा उपलब्ध होऊन ठाण्यातील नागरिकांचे वेगाने लसीकरण होईल, अशी आशा डावखरे यांनी व्यक्त केली आहे.