पालघर जिल्ह्यातल्या ४ तालुक्यांमधील २२ गावांना बसू शकतो निसर्ग चक्रीवादळाचा फटका

पालघर : भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या ४ तालुक्यात समुद्र काठालगत वसलेल्या जवळपास २२ गावांना या निसर्ग

पालघर :  भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या ४ तालुक्यात समुद्र काठालगत वसलेल्या जवळपास २२ गावांना या निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या २२ गावांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यास अंदाजे जवळपास २१०८० इतकी लोकसंख्या बाधित होऊ शकेल.

यात वसई तालुक्यातल्या किनाऱ्यालगत असलेल्या पाचूबंदर(वसई), चांदीप, सायवन, कामण, ससूनवघर, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोडी, भुईगावं बुद्रुक अशा १२ गावांना ह्या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.बाधित होणाऱ्या या १२ गावांची अंदाजे लोकसंख्या ही १२५२० इतकी असल्याचे प्रशासनाकडून सांगितलं जातं आहे.
तर पालघर तालुक्यातल्या किनाऱ्यालगत असलेल्या सातपाटी, जलसारंग, उच्छेळी, मुरबे आणि दांडी अशा ५ गावांनादेखील या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाधित होणाऱ्या या ५ गावांची अंदाजे लोकसंख्या ही ७००० इतकी असल्याची माहिती प्रशासना कडून देण्यात आली आहे. 
 
तसेच डहाणू तालुक्यातल्या किनाऱ्या लगत असलेल्या डहाणू , नरपड, चिखले आणि आंबेवाडी अशा ४ गावांना निसर्ग चक्रीवादळा चा फटका बसण्याची शक्यता असून या ४ गावांची लोकसंख्या अंदाजे १४०० आल्याचं सांगण्यात येतय. तलासरी तालुक्यातल्या  समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या झाई या १ गावाला चक्रीवादळा चा तडाखा बसण्याची शक्यता असून इथली अंदाजे लोकसंख्या ही १६० इतकी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.बाधित होणाऱ्या गावांमध्ये सखल भाग आणि कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.