डोंबिवलीत रेशनिंग दुकानदार आणि राजकीय पक्षांच्या संगनमताने धान्याचा काळाबाजार – नितीन पाटील यांचा आरोप

डोंबिवली : सरकारमान्य स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्याचा काळाबाजार होतो. काही राजकीय पक्ष दुकानातील धान्यवर आपल्या नावाची लेबलं लावून आम्हीच गरिबांचे तारणहार असल्याचा तोरा मिरवित आहेत.

 डोंबिवली : सरकारमान्य स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्याचा काळाबाजार होतो. काही राजकीय पक्ष दुकानातील धान्यवर आपल्या नावाची लेबलं लावून आम्हीच गरिबांचे तारणहार असल्याचा तोरा मिरवित आहेत. याविषयी लेखी तक्रार भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी शिधावाटप उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच ही बाब मुख्यमंत्री, अन्नपुरवठामंत्री, विरोधी पक्षनेते तसेच आमदार यांनाही कळविली आहे. शहरात अशा पद्धतीने होत असलेला काळाबाजार थांबवून अशी कामे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून रेशनधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

डोंबिवली शहरातील पूर्व भागातील काही रेशनिंग दुकानदार काही राजकीय पक्षाच्या लोकांशी संगनमत करून रेशनिंग धान्य परस्पर देत आहेत. हेच धान्य पुन्हा पक्षाचे आणि नेत्यांचे लेबलं गरिबांना देत असल्याचा कांगावा करीत आहेत. अशा प्रकारची घृणास्पद घटना नगरसेवक नितीन पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही गोष्ट शिधावाटप अधिकारी वंजारी यांना फोनद्वारे कळविण्याचा प्रयत्न केला. मात्र वंजारी यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पूर्व मंडल अध्यक्ष नंदकुमार जोशी आणि उमेश पाटील यांनी काळाबाजार होत असलेल्या शिधावाटप दुकानास भेट देऊन काळाबाजार होत असलेल्या घटनेचा निषेध केला. यानंतर मुख्य शिधावाटप अधिकारी बहुरे यांना फोन करून हा प्रकार सांगितला त्यांनीही  कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांनीही दुर्लक्ष केले असे नितीन पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शिधावाटप दुकानातून अशा प्रकारचा काळाबाजार होत असून स्वतःचे नाव वापरून वाटप करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.