मुरबाड तालुक्याबाहेर चारही बाजुंना कोरोनाचे थैमान सुरु असताना मुरबाड तालुक्यात नाही एकही कोरोना रुग्ण

मुरबाड: ठाणे जिल्हा कोरोना संक्रमणाच्या रेड झोनमध्ये असला तरी, मुरबाड तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने प्रशासनाचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे.चारही बाजूंनी कोरोनाच्या विळख्यात

मुरबाड: ठाणे जिल्हा कोरोना संक्रमणाच्या रेड झोनमध्ये असला तरी, मुरबाड तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने प्रशासनाचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे.चारही बाजूंनी कोरोनाच्या विळख्यात असतानाही मुरबाड तालुका आतापर्यंत कोरोना मुक्त आहे, हे केवळ कडेकोट  अंमलबजावणीमुळे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने ऐकायला मिळत आहेत.

सध्या संपूर्ण देश लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात सुरुवातीला डोंबिवली, शहापूर  वगळता रुग्णांची संख्या नगण्य होती.पहिल्या टप्प्यात कडक लॉकडाऊन आणि वातावरण गंभीर असतांना मुरबाडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली होती. सुदैवाने रुग्णाने स्वतःच विलगीकरण काटेकोर पाळल्याने तो आणि त्याच्या संपर्कातील दोघे निगेटिव्ह निघाले. यानंतर मुरबाडच्या दक्षिण सीमेलगतच्या रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील संशयित रुग्ण पुन्हा मुरबाडमध्ये आढळला. सुदैवाने तो ही निगेटिव्ह निघाला. हा रुग्ण जिल्हाबंदीचे उल्लंघन करून आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे यांनी सीमाबंदी अधिक कडक करण्याकडे लक्ष दिले.त्यानुसार हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्याच्या सीमेवर टोकावडे पोलीस ठाण्याचे एपीआय सुहास खरमाटे तर कर्जत, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणांच्या सीमेवर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या देखरेखीखाली चोख पोलीस बंदोबस्त सुरू आहे.

मुरबाड शहर हे तालुक्यातील एकमेव गर्दीचे, बाजाराचे, तालुक्याचे आणि मोठ्या लोकवस्तीचे मध्यवर्ती ठिकाण असले तरी, या गर्दीचे नियोजन करण्यात मुरबाड नगरपंचायतीला यश आले आहे. मुख्याधिकारी परीतोष कंकाळ यांनी शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी अकरापर्यंतच सुरू ठेवण्याचे नियोजन केल्याने दुपारनंतर रस्ते, बाजारपेठ ओस असते.त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी झाला आहे. मुरबाड तालुक्यालगत क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत असतांना मुरबाड सुरक्षित असले तरी,  लगत बाधित क्षेत्र लक्षात घेता येते दहा ते बारा दिवस मुरबाडकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी आवाहन केले आहे.

सध्या मुरबाडच्या सीमा असणाऱ्या कल्याण, शहापूर, बदलापूर, उल्हासनगर, कर्जत  याठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, तर हॉटस्पॉट ठरलेला पुणे जिल्हा आणि लगतच्या घाटमाथा परिसरातून दररोज भाजीपाला मुरबाडमध्ये दखल होत असतांना मुरबाडकर सुरक्षित आहेत ही समाधाची बाब आहे. सध्या मुरबाडकर सुरक्षित असले तरी, कोरोना मुरबाडपासून अवघ्या एका हाकेच्या अंतरावर आहे,त्यामुळे पुढच्या काळात मुरबाडकरांनी अधिक सुरक्षित राहण्याची व काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.