रूग्णालयाचे बिल भरायला पैसे नाहीत, तब्बल १२ तास मृतदेह अडवून ठेवला; नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच देखील रुग्णांच्या मृत्यनंतर रुग्णालये नातेवाईकांना छळ करताना दिसत आहे. तब्बल १२ तास उलटून देखील मृतदेह देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयात कारवाई करावी यासाठी नातेवाईकांनी नौपाडा पोलिसांत धाव घेतली असून लगेचच घटनास्थळी पोलिसही दाखल झाले.

    ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे मृत्यच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असताना ठाण्यातील खासगी रुग्णालयाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मृत रुग्णांचे बिल भरायला पैसे नसल्याने नातेवाईकांना तब्बल १२ तास मृतदेह दिला नाही. नौपाडा भागातील प्रिस्टीन रुग्णालयाचा हा प्रकार घडला असून पैशासाठी रुग्णालयांनी तगादा लावला असल्याची बाब समोर आली आहे.

    कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच देखील रुग्णांच्या मृत्यनंतर रुग्णालये नातेवाईकांना छळ करताना दिसत आहे. तब्बल १२ तास उलटून देखील मृतदेह देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयात कारवाई करावी यासाठी नातेवाईकांनी नौपाडा पोलिसांत धाव घेतली असून लगेचच घटनास्थळी पोलिसही दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून मृतदेह देण्यात आला.

    मंगळवारी राबोडी येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना पालिकेच्या वॉर रूमच्या माध्यमातून नौपाड्यातील प्रिस्टीन रुग्णालय पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले, या महिलेची तब्बेत अचानक बिघडली असल्याने नातेवाईकांना कळवण्यात आले होते, दरम्यान मृत्य झाल्यानंतर आधी ५० हजार भरा आणि नंतर मृतदेह ताब्यात घ्या असे वारंवार त्यांना सांगण्यात आले असल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला.

    दरम्यान मृताच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याने नातेवाईक हतबल झाले असताना पैशांसाठी मृतदेह अडवून ठेवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता रुग्णाचा मृत्य मंगळवारी रात्री २ वाजता झाला असून नातेवाईकांनी ४० हजार आगाऊ पैसे भरले होते. त्यानंतर ५५ हजार उर्वरित रक्कम भरायला सांगितले होते त्यापैकी त्यांनी १० हजार रुपये अदा केले असल्याचे प्रिस्टीन रुग्णालयातील मालक डॉ. सागर कसबजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.