ऐरोली आणि नेरुळकरांना मोठा दिलासा, आरोग्यासाठीची पळापळ अशी होणार कमी

आयुक्तांनी नियोजनात्मक विशेष बैठक घेऊन १ जानेवारीपर्यंत या दोन्ही रूग्णालयात मेडिकल व आयसीयू वॉर्डस् सुरु करण्याचे निर्देशित केले आहे. ही रूग्णालये संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी करावयाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा आयुक्तांनी घेतला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेमार्फत वाशी सार्वजनिक रुग्णालय पुन्हा नॉन कोरोना रुग्णांना उपचारार्थ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालयांच्या उपलब्ध असलेल्या प्रशस्त इमारतींमधील जागांचा संपूर्ण क्षमतेने वापर व्हावा याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

आयुक्तांनी नियोजनात्मक विशेष बैठक घेऊन १ जानेवारीपर्यंत या दोन्ही रूग्णालयात मेडिकल व आयसीयू वॉर्डस् सुरु करण्याचे निर्देशित केले आहे. ही रूग्णालये संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी करावयाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा आयुक्तांनी घेतला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेमार्फत वाशी सार्वजनिक रुग्णालय पुन्हा नॉन कोरोना रुग्णांना उपचारार्थ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

या रुग्णालयावर मोठया प्रमाणात रुग्णांचा भार असतो. ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालयांच्या प्रशस्त इमारती बांधून तयार असूनही त्यांचा वापर केवळ माता आणि बाल रुग्णालय व इतर आजारांच्या बाहय रुग्ण सेवांकरताच होत आला आहे. आयुक्तांनी सदर रुग्णालये पूर्ण क्षमतेने वापरली जावी याकरीता १ जानेवारी २०२१ ची अंतिम मुदत देत दोन्ही रुग्णालयात पुरुष व महिलांकरीता स्वतंत्र मेडिकल वॉर्डस् तसेच १० बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरु करण्याची कार्यवाही करावी असे निर्देशित केले आहे.

सार्वजनिक रूग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच इतर वैदयकीय उपकरणे, गॅस पाईप लाईन व डॉक्टरांसह इतर कर्मचारी उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही तत्परतेने करावी असे आदेश आयुक्तांनी संबंधितांना  बैठकीत दिले. कोरोना रूग्णालयांसाठी घेण्यात आलेली बेड्स व इतर साधनसामुग्री याठिकाणी वापरणे शक्य असून मनुष्यबळही  वापरण्यात येणार आहे.

आयुक्त घेणार आरोग्य विषयक सुविधांचा आढावा

आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ऐरोली व नेरूळ रूग्णालयात १ जानेवारी पर्यंत आयसीयू व मेडिकल वॉर्ड सुरू करण्याप्रमाणेच वाशी रूग्णालयातही सर्व सेवा परिपूर्ण रितीने कार्यान्वित करण्याकडे विशेष लक्ष देत आयुक्त अभिजीत बांगर दर सोमवारी सकाळी ११ वाजता आरोग्यविषयक सुविधांची आढावा बैठक घेणार आहेत.