प्राथमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सक्ती नको : हर्षवर्धन पालांडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण : कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेक गोष्टींचा व्यवहार ऑनलाईन होतो आहे. त्याचप्रमाणे यावर्षी शैक्षणिक पद्धतदेखील ऑनलाईन अवलंबली आहे. हा निर्णय उत्तमच आहे, परंतु या निर्णयामुळे

कल्याण : कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेक गोष्टींचा व्यवहार ऑनलाईन होतो आहे. त्याचप्रमाणे यावर्षी शैक्षणिक पद्धतदेखील ऑनलाईन अवलंबली आहे. हा निर्णय उत्तमच आहे, परंतु या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम कठीण जाणार आहे. छोट्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सक्ती करणे योग्य नाही असे वाटते. कारण या प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिक्षक समोर असतानादेखील खूप अडचणी येतात. त्यांना शिक्षक समोर असताना बरेच प्रश्नचिन्हं असतात, तसेच लहान मुलांना तर ऑनलाईन शिक्षण घेताना ते किती उमजेल  असा सवाल करत प्राथमिक विभागातील विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षणाची सक्ती नको, अशी मागणी शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

कितीतरी पालकांकडे स्मार्टफोन नाही आहेत, तरीही पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी न परवडणाऱ्या शाळांमध्ये प्रवेश करून घेतात. सध्या परिस्थितीमुळे अनेकांचे घर चालवणेदेखील असह्य झाले आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून त्यावर चर्चा करून सरसकट फी बाबत योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेण्यात यावा. तसेच सर्व शाळा किंवा कोणत्याही संस्थेमार्फत चालत असलेल्या शाळा या सर्व शाळांनी ६ महिने कोणतेही शुल्क आकारू नये असे आदेश शासन स्तरावर निर्गमित करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा. कोणती शाळा किंवा संस्था बळजबरीने फी वसूली करण्याचा प्रयत्न करत असेल तर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील हर्षवर्धन पालांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.