जाचक निर्बंध : अचानक दुकाने बंद केल्याने व्यापारी आक्रमक; नवी मुंबईत सर्वत्र गोंधळाचे वातावरण

अचानक दुकाने बंद करायला सांगितल्याने व्यापारी देखील चिंतेत पडले. मात्र राज्य सरकारने सोमवारी सकाळी ७ ते रात्री ८ ची मुदत ही अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवार पर्यंत ठरविण्यात आली आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान उघडे राहणार नाही.

  वाशी : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला होता. फक्त शनिवार आणि रविवारी दोन दिवस संपूर्ण बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र आज अचानक नवी मुंबईतील सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात आली.

  मंगळवार सकाळपासूनच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आपल्या प्रभागात फेरी मारून परिस्थितीचा आढावा घेत असताना दिसून आले. मात्र अचानक दुकाने बंद करायला सांगितल्याने व्यापारी देखील चिंतेत पडले. मात्र राज्य सरकारने सोमवारी सकाळी ७ ते रात्री ८ ची मुदत ही अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवार पर्यंत ठरविण्यात आली आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान उघडे राहणार नाही. असे शासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र अचानक दुकाने बंद करण्यासाठी सांगितल्याने व्यापारी वर्ग गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्यावर उतरताना पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर व्यापारी रस्त्यावर उतरल्याने शेवटी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

  अचानक सर्व दुकाने बंद झाली आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने सर्वसामान्य नागरिकांना राज्य सरकारने आम्हाला फसवून लॉकडाऊन लावला असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. तसेच पालिकेने कोणतीही पूर्व सूचना ना देता दुकाने बंद करायला लावल्याने आक्रमक व्यापाऱ्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमा होऊन पालिकेला जाब विचारण्यासाठी गर्दी केली. लॉकडाऊन लावल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याने दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे

  राज्यात कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासाठी किंवा जमण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई, फूड शॉप व फळांची दुकाने दररोज शनिवार व रविवारसह केवळ सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असतानाही मंगळवारी सरसकट अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद केल्याने व्यापारी आक्रमक तर नागरिक हैराण झालेले पाहायला मिळाले.

  मोबाईल रिचार्जचे काय?

  सध्या मनुष्याच्या आयुष्यात मोबाईलचे महत्त्व वाढलेले आहे. शासनाने गर्दी टाळण्यासाठी ई पेमेंटला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. मात्र असे असताना मोबाईल रिचार्ज करणाऱ्या दुकानांचे काय? आजही अनेक नागरिक रिचार्ज करण्यासठी दुकान गाठत असतात. त्यामुळे रिचार्ज दुकाने बंद केल्यास अनेकांचे हाल होण्याची शक्यता आहे. पालिकेने मोबाईल रिचार्ज दुकानांना देखील अत्यावश्यक सेवेत स्थान द्यावे अशी मागणी वाढू लागली आहे.

  सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची असताना, अचानक मंगळवारी सरसकट दुकाने बंद करण्यात आली. पोलीस व पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही दुकाने बंद करण्यात येत होती. सरसकट दुकाने बंद केल्याने नागरिकांनी करायचे काय? याबाबत आयुक्तांची भेट घेणार आहोत.

  – प्रमोद जोशी, महासचिव, नवी मुंबई व्यापारी असोसिएशन