Our leaders will decide whether to fight through the Mahavikas Aghadi or not; Role of Congress District President

डोंबिवली : राष्ट्रवादी बरोबर आघाडी करूनच कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूक लढविली. आता राज्यात महाविकास आघाडीत प्रमुख तीन पक्ष कार्यरत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस समविचारी पक्ष आहेत. मात्र, आता महाविकास आघाडी माध्यमातून लढायचं की नाही ते आमचे नेतेच ठरवतील अशी भूमिका कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी मांडली आहे.

जर सन्मानाने आम्हाला काही जागा मिळाल्या आणि जेणेकरून आमच्या नगरसेवकांमध्ये वाढ होईल अस झालं तर ठीक असा विचार निश्चित केला जाईल असेही सचिन पोटे म्हणाले.

कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत ए ब्लॉक,  डोंबिवली पश्चिम अध्यक्ष शशिकांत उर्फ गणेश चौधरी यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार,  विश्वरत्न प. पूज्य.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोटे बोलत होते.

यावेळी प्रदेश सदस्य संतोष केणे,  संजय दत्त, माजी नगरसेवक तथा जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, माजी नगरसेविका शारदा पाटील, वर्षा गुजर-जगताप, एकनाथ म्हात्रे,  एम. यु. वर्गीस, पॉली जेकब, गीता चौधरी, निशिकांत रानडे, गजानन ठाकूर, अजय पौळकर आदी उपस्थित होते.

यावेळी गणेश चौधरी म्हणाले, राज्य सरकारच्या अहवालानुसार राज्यात रक्ताची कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित केले. कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे रक्ताचा तुटवडा पडत आहे तो तुटवडा भरून काढण्यासाठी थोडीफार मदत या शिबिरामुळे होईल.