सहा वर्षांचा झाला पालघर जिल्हा

आरोग्या सोबतचं शिक्षण, पाणी, रोजगार यावर अधिक भर देणार -पालकमंत्री दादाजी भुसे

पालघर  : पालघर जिल्ह्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्या चा प्रश्न तर उभा ठाकला आहेच परंतु त्यासोबतचं जिल्ह्यात शिक्षण सुविधा ,पाणीटंचाई,रोजगार निर्मिती आणि इतर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत.कोव्हीड-१९ सोबत तर लढायचं आहेच परंतु सोबतचं जिल्हयातल्या या समस्यां देखील मार्गी लावायच्या आहेत असं प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केलं.

सागरी , डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन होउन त्यातून वेगळा होउन नव्यानं जन्मलेला पालघर हां महाराष्ट्रातला ३६ वा जिल्हा. जो  १ ऑगस्ट २०१४ ला नव्यानं जन्माला आला. १ ऑगस्ट २०२० ला पालघर जिल्ह्याला अस्तित्वात येऊन सहा वर्ष पूर्ण झाली आहेत . आणि या जिल्ह्यांनं आता सातव्या वर्षात प्रदार्पण केलं आहे. 

पालघर जिल्ह्याच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि महसूल दिनानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यावेळी पालकमंत्री भुसे बोलत होते. पूर्ण देशावर हे जे कोरोना चे नवीन संकट आलं त्या दृष्टीनं चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासन प्रयत्न करीत असल्याचं सांगून कोव्हीड-१९ साठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस पडला नसल्यानं  भाताची लागवड थांबली आहे. तसचं भाता सहित जव्हार मधली वरी आणि नाचणी ही पिकं धोक्यात येऊन शेतकरी संकटात येऊ  शकतात अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जि.प.मार्फत जिल्हयात सेमी इंग्रजी शाळा सुरू झालेल्या उपक्रमाचं पालकमंत्र्यांनी कौतुक केलं. तर जिल्हाधिकारी यांनी जि.प.शाळा या १० वी पर्यंत करण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. यावेळी कृषी किंवा महसूल विभागा मार्फत जागा उपलब्ध करून महाराष्ट्र व्यापी रोपवाटिका मॉल उभारून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची रोपे तिथून उपलब्ध होतील असा मानस यावेळी पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला. ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देतात अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकर्यानी यावेळी जिल्हयातली कोव्हीड-१९ ची सद्यस्थिति, पावसाबद्दलची स्थिती,भौगोलिक स्थिती याबद्दल  पालकमंत्र्यांना माहिती दिली. वनहक्क, सातबारा , पीक कर्ज वाटप ,महसूल आणि  इतर विभागातली रिक्त पदे, पशुसंवर्धन,मत्स्य व्यवसाय,कृषी  वनविभाग, मधील योजना आदी  बद्दल सविस्तर आढावा दिला. तसचं  जिल्ह्यातली  कुपोषणाची स्थिती, मध्यम आणि  तीव्र कुपोषित बालके, CSR मार्फत राबवण्यात येणारे उपक्रम, जि.प.शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना, पाणी टंचाई याबद्दल माहिती दिली. जिल्ह्यात पुढील कालावधीत करायची कामे आणि समोर असणाऱ्या अडी अडचणी जिल्हाधिकार्यांनी पालकमंत्र्यां समोर मांडल्या.

या कॉन्फरन्स मध्ये खासदार डॉ.राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा आमदार श्रीनिवास वनगा, वसई विरार महानगरपालिका आयुक्त डी.गंगाधरण, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी किरण महाजन जि.प.अध्यक्ष भारती कामडी, उपाध्यक्ष निलेश सांबरे,मु.का.अ.जि.प.पालघर महेंद्र वारभुवन, सर्व तहसीलदार,प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.