भिवंडी पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी सेना – भाजपची छुपी युती होण्याची शक्यता ?

भिवंडी: एकीकडे कोरोनाने थैमान घातले असले तरी राज्यातील राजकारण संपता संपत नाही तोच आता कोरोनाच्या महामारीत स्थानिक राजकारणालाही उधाण आले आहे . त्यातच ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गत असलेल्या पंचायत

भिवंडी: एकीकडे कोरोनाने थैमान घातले असले तरी राज्यातील राजकारण संपता संपत नाही तोच आता कोरोनाच्या महामारीत स्थानिक राजकारणालाही उधाण आले आहे . त्यातच ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक १५ जुलै रोजी तर पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी ५ जुलै रोजी निवडणुका घेण्यात येणार आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव वाढला असला तरी आता भिवंडीतील ग्रामीण राजकारणाचा पारादेखील चढलेला दिसत आहे. विशेष म्हणजे आता राज्यात सेना भाजपने एकमेकांपासून फारकत घेतली असल्याने स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र भाजपला एकहाती मात देण्यासाठी भिवंडीत महायुतीचा फॉर्म्युला अडीच वर्षांपूर्वीच अस्तित्वात आला होता.

भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकत्र येत भिवंडी पंचायत समिती निवडणूक लढवली गेली होती. महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे पंचायत समितीवर एकहाती दावा करणाऱ्या भाजपला १९ जागांवर समाधान मानावे लागले होते. एकूण ४२ सदस्य संख्या असलेल्या भिवंडी पंचायत समितीत भाजप १९, शिवसेना १९, काँग्रेस २, मनसे १,राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल निर्माण झाले आहे. दरम्यान अडीच वर्षांपूर्वी सभापती निवडणुकीत काँग्रेसचे दोन सदस्य भाजप गोटात गेले असल्याने भाजप व महायुतीकडे २१ – २१अशी सम समान सदस्य संख्या असल्याने या निवडणुकीत चिठ्या उडवून सभापती पद घोषित करण्यात आले होते. ही नशिबाची चिठ्ठी भाजप उमेदवाराच्या नावाने निघाल्याने भाजपच्या रवीना जाधव या सभापती झाल्या होत्या. आता पंचायत समितीत सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने सेनेच्या अनेक सदस्यांनी सभापती पदावर आपली इच्छा व्यक्त केली आहे. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठांचे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठांशी झालेल्या राजकीय कमिटमेंटनुसार या पंचायत समिती सभापती निवडणुकीत ठरल्या कमिटमेंटनुसार भाजपच्या सदस्यांना सोबत घेऊन छुप्या मार्गाने युती करून पंचायत समितीची सत्ता स्थापन करण्याचे राजकारण सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेवर एकहाती महायुतीची सत्ता असतानाही लोकसभा निवडणुकीत झालेल्या सेना भाजपच्या युतीमुळे स्थानिक नेत्यांच्या झालेल्या राजकीय जवळीकीमुळे शिवसेनेने महिला व बालकल्याण समिती सभापती पद भाजपला आंदण दिलेे असल्याने लोकसभेतील सेना भाजपची कमिटमेंट समोर आली आहे. मात्र आता पंचायत समितीत निवडणुकीत शिवसेनेच्या अनेक सदस्यांचा भाजप बरोबरच्या युतीस जाहीर नकार असून जर वरिष्ठांनी आपल्यावर भाजपसोबत युती करण्यासाठी जास्त आग्रह धरला तर आपण थेट आपला सदस्य पदाचा राजीनामा देऊ अशा भूमिकेत अनेक सेना सदस्य आहेत. आहेत त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. 

 सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेकडे २० सदस्य संख्या आहे. राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार सेनेत गेल्याने सेना सदस्य संख्या २० वर पोहचली आहे. त्याच बरोबर मनसेचा एकमेव उमेदवार देखील महायुतीमुळे सेनेसोबत आहे. अडीच वर्षांपूर्वी फुटून भाजपशी हातमिळवणी केलेले काँग्रेसचे दोन सदस्य देखील सेनेसोबत असल्याची माहिती मिळत आहे. आधी भाजपला साथ दिलेले काँग्रेस सदस्य आता राज्यात काँग्रेस सेनेची महायुती असल्यामुळे भाजपसोबत जाणार नसल्याचा दावा कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यामुळे पंचायत समितीत सेनेची ताकद वाढली असून एकूण सदस्य संख्या २३ वर पोहचली आहे तर भाजप १९ वरच अडकली आहे . त्यातच भाजपचे दोन उमेदवार सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळत असल्याने भिवंडी पंचायत समितीत शिवसेनेची ताकद वाढली असल्याने आपल्याला भाजप सोबत युती नको असा पवित्रा सेना सदस्यांनी घेतला आहे. मात्र शिवसेनेचे वरिष्ठ आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.