डोंबिवलीतील पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांचे हाल, मनसेकडून दखल

डोंबिवली : डोंबिवली(dombivali) पश्चिमेला एकमेव पोस्ट ऑफिस(post office) असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्याबाबतच्या तक्रारी मनसेकडे येत आहेत. कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे व काही कर्मचारी रजेवर जात असल्याने ठराविक खिडक्यांवरच काम सुरु आहे. परिणामी नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना अनेक तास रांगेत तिष्ठत उभे रहावे लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर पदाधिकाऱ्यांनी पश्चिमेतील एकमेव पोस्ट ऑफिसबाबत आलेल्या असंख्य तक्रारींबाबत कार्यालयाची पाहणी केली आणि नागरिकांच्या व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष राजेश कदम, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, संदीप म्हात्रे, सचिन कस्तुर, उदय चेऊलकर, राजेश दातखीळ पाटील आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनसेतर्फे प्रश्न विचारण्यात आला की, डोंबिवली पूर्वेस ५ पोस्ट कार्यालय मग डोंबिवली पश्चिमेस एकच कार्यालय का ? सध्या पोस्टाचे डोंबिवली पश्चिमेचे कार्यालय महापालिकेच्या भाड्याच्या जागेत असून पोस्टाच्या स्वतःची जागा गेले पाच वर्ष जीर्ण व धोकादायक इमारत म्हणून पडीक आहे. सध्याच्या कार्यालयाकरिता जागेची कमतरता जाणवत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष न करतात लवकरात लवकर कर्मचारी वर्ग वाढवून सेवा जलद द्यावी व डोंबिवली पश्चिमेस निदान अजून दोन पोस्ट कार्यालय नव्याने सुरु करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

याबाबत पोस्टाच्या सूत्रांनी सांगितले की, पोस्ट कार्यालयाच्या अनेक समस्या असून त्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मांडल्या असून ते याबाबत लक्ष देत आहेत. या विषयी मुंबईत एक बैठक झाली असून पोस्टाच्या मूळ जागेबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. महापालिकेच्या माध्यमातूनही या विषयी चर्चा झाली असून हा विषय अद्याप बंद फाईलमध्ये असल्याने पोस्ट कार्यालयाच्या समस्याचा त्रास सर्वांना होत आहे.