pimpleshwar temple

डोंबिवलीत तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिरात महादेव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली (crowd in temple) होती. तर फडके रोडवरील ग्रामदैवत श्रीगणेशाचे दर्शनही गणेश भक्तांनी घेतले.

डोंबिवली : कोविड महामारीच्या संकटात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने व्यवहार बंद ठेवले होते. यामुळे सर्वच धार्मिक स्थळे बंद होती. मात्र अनलॉकमुळे आठ महिन्यांच्या कालावधीनंतर जवळजवळ सर्व व्यवहार सुरु झाले आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने अटीशर्ती ठेऊन धार्मिक स्थळे उघडली. यामुळे सर्वच धर्मियांना आता आपापल्या पद्धतीनुसार व्यवहार करता येणार आहे. डोंबिवलीत तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिरात महादेव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली(crowd in temple) होती. तर फडके रोडवरील ग्रामदैवत श्रीगणेशाचे दर्शनही गणेश भक्तांनी घेतले.

डोंबिवली(dombivali) रेल्वे स्थानकापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असणारे महादेव मंदिर सव्वाशे वर्षांपूर्वीचे असून महाकाय वड-पिंपळ, आंबा, फणस, जांभुळ, नारळ अशा निरर्गरम्य वनराईच्या साडेआठ एकर जागेत आहे. श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ (ट्रस्ट) तर्फे नांदिवली पाडा (सागांव) मुरारबाग, एम.आय.डी.सी. फेज-२ मानपाडा क्रॉस रोड, डोंबिवली (पूर्व) येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होतो. श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ (ट्रस्ट) मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले की,शासनाच्या निर्देशानुसार मंदिरातील भक्तगणांना महादेवाचे दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे.

डोंबिवलीत खिडकाळेश्वर मंदिर, मयुरेश्वर मंदिर, श्रीगणेश मंदिर, शनि मंदिर, मानपाडेश्वर, आयप्पा मंदिर, स्वामी नारायण मंदिर, शिवमंदिर, स्वामी समर्थ मंदिर, बालाजी मंदिर आदी मंदिरातून भक्तांची नेहमी मोठ्या संख्येने गर्दी असते. डोंबिवली पश्चिम विभागात एक मशीद असून मुस्लिम बांधव शुक्रवारी मोठ्या संख्येने नमाज पडतात तर ख्रिश्चन धर्मियांसाठी पूर्व-पश्चिम विभागात दोन चर्च असून त्याद्वारे त्यांची धार्मिक कार्यक्रम होत असतात. बुद्ध विहारातही बुद्धवंदना करण्यासाठी समाजबांधवाची तयारी होती. सर्वच धर्मियांना गेले आठ महिने कोणतेच कार्यक्रम करता आले नसल्याने आता काही प्रमाणत कार्यक्रम करता येतील यामुळे सर्व धर्मियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिर प्रवेशासाठी भक्तांना मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात आला असून त्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर, मास्क बंधनकारक, थर्मल स्कॅनिंग, हात सॅनिटाईज आदी पंधरा सूचना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी गर्दी होईल याची काळजी मंदिर व्यवस्थापनाने घेतली असल्याची माहिती श्रीगणेश मंदिर संस्थान अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले.