ठाणे जिल्ह्यातील मुलींचा टक्का वाढतोय; ‘बाल लिंग’ गुणोत्तरात वाढ दर हजार मुलांमागे ९७९ मुली

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून २०१७ सालापासून केंद्र सरकारचा हा उपक्रम राबविला जात आहे. मुलींच्या लिंग गुणोत्तरात वाढ होणे, त्यांना शिक्षण देणे आणि संरक्षण करणे या त्रिसूत्रीला आधारभूत मानून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

  ठाणे : गेल्या चार वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. २०१७ साली दर एक हजार मुलांमागे मुलींचा जन्म होण्याचे प्रमाण ९४९ इतके होते. २०१८ आणि २०१९ साली ते अनुक्रमे ९६० आणि ९७६ इतके वाढले. यंदा त्यात आणखी भर पडून ही संख्या ९७९ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असणार्‍या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमामुळेच जिल्ह्यात बाल लिंग गुणोत्तरात वाढ झाल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

  जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून २०१७ सालापासून केंद्र सरकारचा हा उपक्रम राबविला जात आहे. मुलींच्या लिंग गुणोत्तरात वाढ होणे, त्यांना शिक्षण देणे आणि संरक्षण करणे या त्रिसूत्रीला आधारभूत मानून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या जन्माविषयी समाजात जाणीवजागृती करण्यात येत आहे.

  त्यामुळे बाल लिंग गुणोत्तर वाढण्यास मदत झाली आहे. यासाठी अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणांहून व्यापक पद्धतीने कार्यक्रम हाती घेण्यात आले, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) संतोष भोसले यांनी दिली आहे.

  लेकीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

  झोळीमुक्त अभियान, वनकन्या, बालिका दिवस, मुलींचा जन्मोत्सव, मुलीच्या जन्माबद्दल मुलींचे आणि कुटुंबीयांचे दवाखान्यात जन्म प्रमाणपत्र व मिठाई देऊन अभिनंदन करण्यासारखे अनेक उपक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने राबविले जात आहेत. मुलगी दत्तक घेणे, किशोरी मेळावे घेणे आणि मुलगी असणार्‍या जोडप्यांना पुरस्कृत केले जाते. खेळात प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार केला जातो.

  गुड्डा-गुड्डी बोर्ड लावणे, ५ व्या वर्गातून ६ व्या वर्गात, सातवी ते नववीपर्यंतच्या आणि दहावीतून ते १२ वीपर्यंतच्या वर्गात जाणार्‍या मुलींचे १०० टक्के लक्ष साध्य करणार्‍या शाळा-महाविद्यालयांना ५ हजार अनुदान देणार्‍या योजना प्रभावी ठरत हेत. दहावी-बारावीला पहिल्या दहामध्ये आलेल्या मुलींना अनुक्रमे ५ आणि १० हजार रोख रक्कम देऊन अभिनंदन करून मुलींच्या जन्माचा सन्मान केला जात आहे. त्याशिवाय जिल्हा टास्क फोर्स समितीने सुचवलेल्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.