लाखो रुपये खर्च करुन म्हसा रस्त्यालगत लावलेली झाडे गायब

मुरबाड: विकासाचा गाजावाजा करत मुरबाड म्हसा रस्त्यालगत(murbad-mhasa road) लावलेली लाखो रुपयांची झाडे(trees) गायब झाली आहेत. मुरबाड नगरपंचायतीचे लाखो रुपये यामुळे पाण्यात गेले आहेत. मात्र त्याकडे नगरपंचायतीने सोयीस्कररित्या दुर्लक्ष  केले आहे.

मुरबाड म्हसा रस्त्यावर मुरबाड ते साजई फाटा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. यात लाखो रुपये किमतीची झाडे विकत आणून ती रस्त्याच्या दुतर्फा आणि डिव्हायडरच्या मध्ये लावण्यात आली होती. सुरुवातीला या झाडांची दिखाव्याकरता देखभाल करण्यात आली. मात्र यानंतर याकडे दुर्लक्ष केल्याने या झाडांची अवस्था खराब झाली आहे.

ही शेकडो झाडे मरून पडली असून आता त्याठिकाणी गवत आणि झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावर मधोमध दिवेही लावण्यात आले होते.याच नाक्यावर रंगीबेरंगी रोषणाईच्या झगमगाटात नाचगाण्यांवर थिरकत या दिव्यांच्या लोकार्पणाचा भव्य सोहळाही पार पडला होता.सध्या या दिव्यांनीही या झाडांप्रमाणेच माना टाकल्या यातील अनेक दिवे रात्रीच्या अंधारात गडप होत आहेत. मुरबाड नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर मुरबाड शहराचा विकास होणे अपेक्षित होते, मात्र गाजावाजा करण्यापलीकडे शहरात कामे झाली नाहीत. त्यात नगरपंचायतीला झालेल्या विकासकामांचा जाब विचारण्यासाठी कोणताही सक्षम विरोधीपक्ष नसल्याने नगरपंचायतीची कामं करणाऱ्या ठेकेदारांची चांदी झालीय.
या रस्त्यालगतच्या झाडांवर लाखो रुपये खर्च झाला असताना याची देखभालही कागदावर झाल्याने ही लाखमोलाची शेकडो झाडे मरून पडली आहेत. मुरबाडकरांच्या कराचा पैसा असा वाया जात असताना मुरबाड शहरवासीय हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.