भिवंडीत या ठरावावरून तापलं राजकीय वातावरण, आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

भिवंडीतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भातील ठराव पारित करण्यात आला. जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मंजुरी देणार नाही, असे आश्वासन आम्हाला पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिले असून जोपर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डू यांनी दिली आहे.

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भातील ठराव पारित करण्यात आला. विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे. मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील पालिका आयुक्तांकडे सादर केले. या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड , ज्येष्ठ नेते प्रदीप राका, वसीम अन्सारी , फराज बाबा , जाकीर मिर्जा , सिद्धेश्वर कामूर्ती , जुबेर अंसारी , आरिफ खान , आबू सुफियान , अरुण राऊत , नासिर खान , मोहम्मद हुसेन , साद मोमीन, इरफान वायरमन , साजिद खान , राहुल पाटील , मुजाहिद अंसारी , साजिद अंसारी , अश्रफ मुन्ना आदी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान आंदोलनादरम्यान आपण पालिका आयुक्तांची भेट घेतली असता सदरचा ठराव अजून माझ्यापर्यंत मंजुरीसाठी आलेला नसून त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय. जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मंजुरी देणार नाही, असे आश्वासन आम्हाला पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिले असून जोपर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डू यांनी दिली आहे.