ganesh naik and ajit pawar

अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत सिडकोला(Cidco) भेट देऊन झाडाझडती घेतली. या बैठकीत अजित पवारांनी(Ajit Pawar) नवी मुंबईतील(Navi Mumbai) रेंगाळलेल्या प्रश्नांना हात घातला आहे. तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रेंगाळलेले प्रकल्प, नागरिकांच्या सिडकोबाबत असलेल्या तक्रारी याबाबत कायम पाठपुरावा घेण्यासाठी अजित पवार हे मविआच्या मंत्र्यांसोबत पंधरवड्याला भेटीगाठी सुरू करणार आहेत.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : तातडीने नागरिकांच्या तक्रारी सोडवणारे नेते अशी ख्याती असलेल्या अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत सिडकोला(Cidco) भेट देऊन झाडाझडती घेतली. या बैठकीत अजित पवारांनी(Ajit Pawar) नवी मुंबईतील(Navi Mumbai) रेंगाळलेल्या प्रश्नांना हात घातला आहे. तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रेंगाळलेले प्रकल्प, नागरिकांच्या सिडकोबाबत असलेल्या तक्रारी याबाबत कायम पाठपुरावा घेण्यासाठी अजित पवार हे मविआच्या मंत्र्यांसोबत पंधरवड्याला भेटीगाठी सुरू करणार आहेत. यात नवी मुंबई पालिका व एमआयडीसीलादेखील भेटी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये मरगळ जाऊन उत्साहाचे वातावरण दिसून येऊ लागले आहे.

  महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर नवी मुंबईत मात्र आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची तिन्ही दिशांना तीन तोंडे अशी अवस्था पाहण्यास मिळत आहे. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांनी एकत्र येत कार्यक्रमांद्वारे नवी मुंबईत वातावरण निर्मिती करावी, अशी मागणी वाढत होती. पालिका, सिडको अथवा एमआयडीसीत भेटी देऊन राज्यातील वातावरण स्थानिक पातळीवर जिवंत ठेवावे यासाठी स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नांत होते. मात्र मविआची ही कमकुवत बाजू ओळखून दुसरीकडे आ. गणेश नाईकांनी संधी साधत दर आठवड्याला पालिकेत आयुक्तांची भेट घेत भाजपाचे पारडे जड करण्यास सुरुवात केली. आ. मंदा म्हात्रे यांनीदेखील स्वतःच्या मतदारसंघात विविध विकासकामांद्वारे पक्षाची बाजू मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. मात्र आगामी निवडणुकांचे गंभीर्य लक्षात घेता व नवी मुंबईसारखे श्रीमंत शहर पालिकेच्या सत्तेच्या रुपात आपल्याकडे असावे यासाठी खुद्द अजित पवारांनी कंबर कासलेली पाहण्यास मिळत आहे.

  जितेंद्र आव्हाड व शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर नवी मुंबईच्या निवडणुकांची मदार असली तरी; आ. गणेश नाईकांची ताकद ही स्थानिक नेते म्हणून वरचढ ठरणारी आहे. त्यात सिडकोमुळे या सुनियोजित शहरात पालिकेच्या सत्तेच्या चाव्या गेली २९ वर्ष स्वतःकडे राखून ठेवण्यात आ. गणेश नाईकांना यश आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत असताना सर्वस्वी गणेश नाईकांवर एकहाती जबाबदारी सोपवून निश्चिंत राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना नवी मुंबईत पूर्ण ताकदीने उतरावे लागणार आहे. मुख्य म्हणजे खुद्द अजित पवार नवी मुंबईत सातत्याने दौरे करणार असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे व काँग्रेसच्या नेत्यांनादेखील आपले नवी मुंबईतील दौरे वाढवून अस्तित्व दाखवावे लागणार आहे. अन्यथा अजित पवारांच्या दौऱ्यावर शिवसैनिक व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्थानिक प्रश्नांसाठी अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.

  मंत्री एकनाथ शिंदे व काँग्रेस नेत्यांना वाढवावे लागणार नवी मुंबईचे दौरे
  महाविकास आघाडीतील नेत्यांना नवी मुंबईसारख्या विकसित, आधुनिक व सुनियोजित शहरात येऊन विकासाची स्वप्ने दाखवून जड जाणार आहे. त्यापेक्षा प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरांचे नियमितीकरण, साडेबारा टक्क्यांमधील उर्वरित पावणेचार टक्के भूखंड, झोपडपट्टीतील एसआरए योजना, तसेच ज्या नागरिकांनी अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेतली आहेत. त्या घरांवर कारवाई न करता नागरिकांना दिलासा देणे या समस्या मविआला सोडवाव्या लागणार आहेत. तरच मविआला पालिकेच्या निवडणुकांत आपल्या कामांचे नाणे खणखणीतपणे वाजवता येणार आहे. त्याचा फायदा पनवेल व उरणसारख्या भागांमध्येदेखील मविआला होणार आहे. ही शहरे येत्या काळात महामुंबईच्या दृष्टीने आर्थिक हब बनण्याच्या दिशेने आहेत.

  आ. गणेश नाईकांना मिळणार का आ. मंदा म्हात्रेंची साथ ?
  मविआच्या स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठींमध्ये दिसून येत नसलेल्या एकीची संधी साधता गणेश नाईकांनी आयुक्तांच्या सातत्याने भेटीगाठी घेत भाजपाचे पारडे जड केले होते. मात्र आता जर खरोखर अजित पवारांनी मनावर घेत नवी मुंबईत ठाण मांडली तर मात्र भाजपा पुन्हा बॅकफूटवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्पग्रस्तांकडून देखील अजित पवारच आमचे गरजेपोटी घरांच्या नियमितीकरणाचा प्रश्न सोडवू शकतात असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या दोन दादांमधील द्वंद्व येत्या काळात नवी मुंबईत पाहण्यास मिळणार आहे. त्या जोडीला अजित पवारांना जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, शशिकांत शिंदे यांची साथ मिळणार आहे. तर दुसरीकडे आ. नाईकांना स्वपक्षीय आ.मंदा म्हात्रे यांना न दुखावता मविआशी दोन हात करावे लागणार आहेत. आजतागायत एकदाही एकत्र न आलेले आ. नाईक व आ.म्हात्रे यांचे एकत्र येणेच मविआविरोधात भाजपाला तारक ठरणार आहे. त्यामुळे मविआशी दोन हात करताना आ.मंदा म्हात्रे यांची साथ नाईकांना मिळणार का ते पाहावे लागणार आहे. या दोन्ही नेत्यांची आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जरी एकी झाली तरी अद्यापही स्पष्ट जाणवत असलेली जुने व नव्या कार्यकर्त्यांमधील दरी मिटणार का ? ते पाहावे लागणार आहे.