डोंबिवलीत मानवनिर्मित खड्ड्यांमुळे रेतीबंदर रोडवरील नागरिक हैराण

डोंबिवली : शहरात रस्त्यातील खड्ड्यांमुळे काही वर्षांपूर्वी प्रशासनाची तसेच सत्ताधाऱ्यांची पळता भुई झाली होती. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती होती. आजही याची आठवण नागरिक करून देत असले

डोंबिवली : शहरात रस्त्यातील खड्ड्यांमुळे काही वर्षांपूर्वी प्रशासनाची तसेच सत्ताधाऱ्यांची पळता भुई झाली होती. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती होती. आजही याची आठवण नागरिक करून देत असले तरी पालिका अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. पश्चिमकडील रेतीबंदर रोडवर मानवनिर्मित खड्यांमुळे वाहन चालकांना तसेच पादचारी लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जरी पालिका अधिकारी याच रस्त्याने सतत फेरफटका मारत असले तरी त्यांना रस्त्यातील खड्डे दिसून येत नाहीत. आधीच शहरातील नागरिक कोरोनामुळे भयभीत झाले असून आता त्याच्या जोडीला ऐन पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातांना सामोरे जायचे का अशी विचारणा करीत आहेत.

रेतीबंदर रोडवर पालिकेचे “ह” प्रभाग कार्यालय असून याच रस्त्यावरून सतत पालिका अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असतात. विशेष म्हणजे याच रस्त्याच्या दुतर्फा आठवडा बाजारही भरतो. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी याच रस्त्यावर फेरीवाले आणि आठवडा बाजार विक्रेत्यांची मोठी गर्दी होत असून पश्चिम विभागातील सर्वच नागरिक या बाजारात खरेदीसाठी येत असतात. यामुळे तरी या रस्त्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. मात्र प्रशासन ती पुरी करू शकत नाही. मोठा गाव, देवीचा पाडा, महाराष्ट्रनगर, आनंदनगर विभागातील नागरिक याच रस्त्याचा वापर मोठया प्रमाणावर करीत असतात. रस्त्यातील खड्ड्यांमुळे दोन चाकी, चारचाकी आणि रिक्षा चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे खड्डे हे निसर्गनिर्मित नसून केबल टाकणे, पाण्याची पाईपलाईन टाकणे किंवा रस्त्यात दुरुस्ती करणे यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविणे हे पालिका प्रशासनाने काम असूनही याकडे डोळेझाक केली जात आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्ही सर्वजण कोविड – १९ या समस्येत व्यस्त असून इतर कामाबाबत लक्ष देत येत नाही अशी बोळवण केली जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी टेंडर काढण्यात आले नाही अशीही उत्तरे अधिकारी देत आहेत. पालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पावसाळ्यात आता रेती बंदर रोडवरील नागरिकांनी खड्ड्यातुनच ये-जा करायची का ? शहरात आता बरेच मुख्य रोड सिमेंट काँक्रीट झाले असून थोडेच रस्ते डांबरीकरणाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच या रस्त्यातील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे नाहीतर पुन्हा खड्ड्यांमुळे डोंबिवली प्रकाशात येईल अशी चर्चा शहरात होत आहे.