रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने शासनाचा बंधारा केला जमीनदोस्त –  दहा लाख रुपये पाण्यात, प्रहार संघटनेची तक्रार

मुरबाड: रस्त्याच्या कामात बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा येतो म्हणून ठेकेदाराने बेकायदेशीरपणे चक्क हा शासनाने बांधलेला बंधाराच जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला आहे. याबाबत प्रहार संघटनेने

मुरबाड: रस्त्याच्या कामात बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा येतो म्हणून ठेकेदाराने बेकायदेशीरपणे चक्क हा शासनाने बांधलेला बंधाराच जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला आहे. याबाबत प्रहार संघटनेने ठाणे जिल्हा परिषदकडे तक्रार करून या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुरबाड तालुक्यात अँन्युटी हायब्रीड या कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत रस्त्याची कामे सुरू आहेत. यातील रस्त्यांपैकी म्हसा – धसई रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यालगत गोरखगड येथे तूळई, देहरी, तळेखल, देशमुख पाडा, उचले येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नैसर्गिक नाल्यावर जिल्हा परिषदच्या लघुपाटबंधारे विभागाकडून ९ लाख, ४९ हजार, ७२२ रुपये खर्चून सिमेंट के.टी.बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र या बंधाऱ्याच्या पाण्याचा रस्त्याचे काम करताना अडथळा येतो म्हणून मुजोर ठेकेदाराने हा बंधाराच जेसीबीने उखडला असल्याचे दिसून आले आहे. या बाबतीत ठेकेदाराने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन,पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा लघुपाटबंधारे विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत प्रहारचे तालुका अध्यक्ष शरद पाटील यांनी तक्रार करून ठेकेदारावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.