ganesh naik

प्रत्येक गोष्ट भाजपाला(bjp) विचारल्याशिवाय करता येत नसल्याने गणेश नाईकांची(ganesh naik) अवस्था घर का ना घाट का झाल्याची टीका राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबई : गणेश नाईकांना(ganesh naik) शरद पवारांनी(sharad pawar) सर्वकाही दिले. कारभार हाकताना पवारांनी मागे वळून देखील पाहिले नाही. मात्र आता प्रत्येक गोष्ट भाजपाला विचारल्याशिवाय करता येत नसल्याने गणेश नाईकांची अवस्था घर का ना घाट का झाल्याची टीका राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केली आहे. ते सानपाडा येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या महारांगोळीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

गणेश नाईकांनी नवी मुंबईत असलेल्या पार्किंग स्लॉटमध्ये सिडको उभारत असलेल्या परवडणाऱ्या घरांना विरोध केला आहे. याबाबत ते पंतप्रधानत नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पार्किंगमधील हे प्रकल्प रद्द करावेत,अशी मागणी करणार आहे.  याबाबत आ. नाईक यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेतल्यावर प्रसारमध्यमांशी बोलताना पार्किंग क्षेत्रात रहिवाशी प्रकल्प उभारण्याची कल्पना आणणारा हा बुद्धिवंत कोण? असे वक्तव्य केले. मुख्य म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सिडकोकडून या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. त्यावरून माजी महापौर जयवंत सुतार यांनी देखील सिडकोच्या या योजनेला विरोध दर्शविला आहे. मात्र आ. नाईकांचे या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलीत दिले आहे. या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांनी आ. गणेश नाईकांवर टीका केली आहे

नाईकांनी सिडकोची ही योजना आणणारा हा बुद्धिवंत कोण? असा ‘बुद्धिवंत’ उल्लेख करून स्वपक्षीय नेत्याला घरचा आहेर दिला असल्याची टीका देखील पाटील यांनी फडणवीस यांचे नाव न घेता केली. ते म्हणाले की,राष्ट्रवादीत असताना पवारांनी गणेश नाईकांना संस्थान उभे करून दिले मात्र, सध्या त्यांना एकही कार्यक्रम भाजपाच्या परवानगीशिवाय घेता येत नाही. ते कधीही व्हाईट हाऊसच्या बाहेर पडले नव्हते, मात्र आता त्यांना दर आठवड्याला पालिकेत जावे लागत आहे. यावरून भाजपात गणेश नाईकांचा कोंडमारा झाल्याचे दिसत आहे,अशी खरपूस टीका पाटील यांनी केली.

याआधी देखील प्रशांत पाटील यांनी ऐरोलीत एका कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आ. गणेश नाईकांवर टीका केली होती. या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी आव्हाड यांना कार्यकर्त्यांनी तलवार भेट म्हणून दिली होती. ही तलवार आव्हाड यांनी म्यानातून उपसून बाहेर काढताच ही तलवार गणेश नाईकांसाठी आहे का ? असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांनी केले होते. मात्र यावर भाजपाने आक्रमक भूमिका घेत पोलिसांत तक्रार केल्यावर मात्र आमच्या पक्षात देखील अनेक गणेश नाईक नामक कार्यकर्ते आहेत, त्या पक्षातील कार्यकार्त्यांबाबत असे वक्तव्य केल्याची सारवासारव पाटील यांनी केली होती.