आरोग्य व्यवस्थेतील हेळसांड खपवून घेणार नाही – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्णांना वेळेवर उपचारदेखील मिळत नाहीत. याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कल्याण

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्णांना वेळेवर उपचारदेखील मिळत नाहीत. याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करत कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य व्यवस्थेतील हेळसांडपणा खपवून घेणार नाही असा इशारा पालिका आयुक्तांना दिला आहे. कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी आज महापालिका आयुक्तांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयालाही भेट देऊन पाहणी केली.

राज्यात शिवसेनेची सत्ता, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री, कल्याणात शिवसेनेचा खासदार, आमदार, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता एवढे सगळे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वयाआभावी आज कल्याण डोंबिवलीत कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र येत्या आठ  दिवसांत कल्याण डोंबिवलीतील परिस्थिती सुधारली नाही तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
 
आजच्या परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीकर खूप भोगत आहेत. मात्र हॉस्पिटलमधील व्यवस्था आणि समन्वयाच्या अभावाने कल्याण डोंबिवलीत मृत्यू वाढत चालल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी यावेळी केला. महानगरपालिका आणि इथल्या राजकीय नेतृत्वामध्ये ताळमेळ नाहीये. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी जास्त निधी लागत नाही. मात्र तेव्हढे देखील ही महापालिका उपाययोजना करू शकत नाही हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीकाही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी केली. तसेच या सर्व मुद्द्यांबाबत आजच्या बैठकीत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्याचे सांगत येत्या ८ दिवसांत आम्हाला कल्याण डोंबिवलीच्या परिस्थितीत बदल दिसला नाही तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.
 
तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाच्या उपाययोजनांबाबत स्पेशल केस म्हणून एक न्याय आणि कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये का होऊ शकत नाही असा सवाल माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी उपस्थित करत त्यांनीही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.या बैठकीला आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार तथा भाजप सरचिटणीस  नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे,  माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, गटनेते शैलेश धात्रक, नगरसेवक दया गायकवाड, भाजपा शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.