पालिका आयुक्तांची अदलाबदली हा कोरोनावरील उपाय नव्हे – विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना वारंवार आयुक्तांची बदली करण्यात येत आहे. परंतु, क्वारंटाईन सेंटर, डॉक्टर, नर्स आणि आरोग्य यंत्रणेतील इतर मनुष्यबळाचा तुटवडा यांची

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना वारंवार आयुक्तांची बदली करण्यात येत आहे. परंतु, क्वारंटाईन सेंटर,  डॉक्टर, नर्स आणि आरोग्य यंत्रणेतील इतर मनुष्यबळाचा तुटवडा यांची परिस्थिती मात्र जैसे थे स्वरुपाची आहे. केवळ राजकीय आरोप झाले किंवा आरोग्य व्यवस्था कोलमडली की बदल्या केल्या जात असल्या तरी अशा कोरोनाच्या संकटमय परिस्थितीत फक्त आयुक्तांची अदलाबदली हा कोरोनावरील उपाय नसल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.

 दरेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन करत असलेल्या उपाययोजना आणि तुटवडा यांची माहिती घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. महापालिका भवन येथे ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ.बिपिन शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीबबाबत चर्चा करून उपलब्ध आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, ठाणे भाजपचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेद्र नार्वेकर, ठाणे महापालिका गट नेते संजय वाघुले, पोलिस आयुक्त बोरसे, ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नगरसवेक संदीप लेले,नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक नारायण पवार, नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवका कृष्णा पाटील, नगरसेवक विकास पाटील, नगरसेविका नम्रता कोळी, नगरसेविका दिपा गावंड, नगरसेविका कुणाल पेंडसे, नगरसेविका नंदा पाटील, ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरेकर म्हणाले यांनी सांगितले की, पालिका आयुक्तांची बदली हा कोरोनाशी लढण्याचा उपाय नव्हे. शिपायांचा सन्मान राखून शिपायांच्याही अशाप्रकारे बदल्या केल्या जात नाहीत, ज्या पद्धतीने आतापर्यंत पाच ते सहा आयुक्त बदलण्यात आले या बदल्यांमागे मोठे गौडबंगाल दिसतय. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी काही आयक्तांच्या बदल्या केल्याचे सांगण्यात येते. काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही त्यांच्या माध्यमातून झाल्याची चर्चा आहे. मात्र मुख्य सचिवांनी देखील काही बदल्यांचे आदेश नगरविकास मंत्र्यांना अंधारात ठेवून काढले. तरी,मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत नाही ना असा संशय दरेकर यांनी व्यक्त केला. आयुक्त बदलून प्रश्न सुटत नाही. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय उपकरणे आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही आजची गरज आहे. सनदी अधिकारी असलेल्या एका आयुक्तांना प्रशासकीय यंत्रणा उभी करण्यासाठी तसेच परिस्थितीची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी साधारण दोन महिने लागतात. आणि तडकाफडकी बदली केलेले आयुक्त सेवेते आल्यावर तेथील परिस्थिती समजून घेण्यास किमान पंधरा दिवस जातात. त्यामुळे अशा गंभीर परिस्थिती जबाबदार अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे योग्य नसल्याची ठाम भूमिकाही दरेकर यांनी मांडली.  

मुंबईनंतर ठाणे महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे. येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता आहे. ठाण्यात कालच नवीन आयुक्त  रुजू झाल्यामुळे त्यांना युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नवनियुक्त अधिकाऱ्यांनी दोन दिवसात चांगली माहिती दिली त्याचे समाधान आहे. त्यांची काम करण्याची इच्छा आहे. परंतु,हे करत असताना त्यांचीही तडकाफडकी बदली केली जाऊ नये असा टोलाही दरेकर यांनी लगावला. एखादा झटका आल्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. शासनाला आलेला झटका हे धोरण ठरतं. आयएएस सारखे अधिकारी प्रशासनाचा किंवा महानगरपालिकेचा प्रमुख असतो. अशाप्रकारे यांच्या बदल्या करणे योग्य नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने व त्यांची कार्यालये बदलत असल्यामुळे जबाबदार आयएएस अधिकाऱ्यांचा खेळ झाला आहे अशी टीकाही दरेकर यांनी केली. राजकारण हे राजकारण्यांसाठी आहे परंतु आयएएस सारख्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करतना शहराचा आणि नागरिकांचा कोरोनाच्या परिस्थितीत विचार सरकारने करणे आवश्यक आहे. महिन्या महिन्याला अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे व्यवस्था विस्कळीत होऊन प्रशासकीय नियंत्रण निघून जाते, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राहत नाही व व्यवस्थेचा बोजवारा उडतो, परिणामी रुग्ण वाढ आणि मृत्यूदर वाढतो असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या परिस्थितीत विरोधी पक्ष म्हणून आमचे संपूर्ण राज्यभरात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढून मृत्यू होत आहेत ते हे नेमके कशामुळे होतेंय, यात काही प्रशासकीय अडचणी आहेत का याचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. या वाढत्या प्रादुर्भावाला कशाप्रकारे लगाम घालता येईल यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य प्रमुख यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दौऱ्या दारम्यान केवळ आढावा घेऊन निघून जात नाही तर त्या ठिकाणच्या रुग्णालयांना देखील भेट देण्यात येते. रुग्णालयांना भेट देऊन तेथील व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन, वैद्यकीय उपकरणे,मनुष्यबळ त्याचबरोबर विभागातील क्वारांटाईन सेंटर येथील वैदयकीय व्यवस्था.. तेथे औषधे उपलब्ध होतात का या संदर्भात माहिती घेण्यात येते. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतात असेही त्यांनी सांगितले. 

ठाणे जिल्हा दौऱ्या दरम्यान दरेकर यांनी भाईंदर पाडा येथील क्वारांटाईन सेंटरला भेट दिली. भाजप युवा मोर्चा आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली. त्यानंतर ग्लोबल हॉस्पिटलला भेट देऊन तेथील आरोग्य यंत्रणा आणि रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

ग्रामीण भागातल्या रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येताना अनेक अडचणी येत असून या रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी अशी मागणी दरेकर यांनी केली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर यंत्रणा उभी केली असून येथे कशा प्रकारे सेवा देण्यात येते याबाबतच्या सूचना देण्यता आल्या. सिव्हिल हॉस्पिटल येथे ५० व्हेंटिलेटर अवश्यक असताना केवळ १५ उपलब्ध आहेत. ठाणे जिल्हातील प्रमुख हॉस्पिटल असताना येथील अधिकाऱ्यांनी आवश्यक आरोग्य उपकरणांची मागणी करून व्यवस्थेला अधिक गतिमान कराव्या असे निर्देश दरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.