कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये – दरेकरांनी भिवंडी दौऱ्यामध्ये मांडले मत

मुंबई: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाबरोबर आरोग्य यंत्रणांची कमतरता ही देखील गंभीर समस्या आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्स,आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाहीत.यासाठी नवीन यंत्रणा उभ्या करण्यासाठी

मुंबई: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाबरोबर आरोग्य यंत्रणांची कमतरता ही देखील गंभीर समस्या आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्स,आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाहीत.यासाठी नवीन यंत्रणा उभ्या करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जाहिराती देऊनही त्याला प्रतिसाद नाही. तरी यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये, अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये कशा पध्दतीने नियोजन केले गेले आहे व भविष्यामध्ये जे रुग्ण वाढतायत त्यासंदर्भात कोणत्या कमतरता आहेत व कोणत्या उपाययोजना केल्या पाहीजेत यासंबधीत तपशीलवार चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज भिंवडीचा दौरा केला. भिवंडी निजामपूर शहरातील महानगरपालिका कार्यालय येथे महापौर, पालिका आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी महापौर प्रतिभा पाटील, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष शेटटी, आयुक्त प्रविण अष्टीकर, उप जिल्हाधिकारी वैदही रानडे, पोलीस अधिकारी शिंदे, वैद्यकीय अधिकारी यांसह भारतीय जनता पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

दरेकर यांनी सांगितले की, आज झालेल्या बैठकी दरम्यान डॉक्टरांची कमतरता असल्याचे समजले. मुंबईमधल्या डॉक्टरांना जे मानधन आहे ते येथे मिळत नसल्याने डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. ज्या ठिकणी चार फिजिशियन हवे आहेत तिकडे एकच फिजीशीयन उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे चार अनेस्थेटीक डॉक्टर हवे तिकडे देखील एक डॉक्टर उपलब्ध आहे. अशाप्रकारे ज्या ठिकणी ४६  कर्मचाऱ्यांची गरज आहे ठिकाणी फक्त २० कर्मचारी उपलब्ध आहेत.त्यामुळे आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपूरे आहे. तरी मनुष्यबळ अपुरे असतानाही बेडची संख्या वाढविली जात असून जर येथे डॉक्टर,नर्स, तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा नसतील तर बेडसंख्या वाढवून काय उपयागे असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. 
दरेकर पुढे म्हणाले, काही कोटीच्या निधीमुळे महापालिकेला अथवा राज्य सरकारला फरक पडत नाही. हा निधी उपलब्ध करण्याच्या सूचना आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयालयांना दिल्या आहेत. केवळ कमतरता समजून न घेता त्यासंबंधीत  कोणत्या आवश्यक उपाययोजना करायच्या आहेत यासाठी आम्ही शासनाशी बोलू. शासनाला भिवंडीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करायला भाग पाडू. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन समाजात होताना दिसत असून लोक मास्कचा वापर करत नाहीत. यासाठी पत्रकारांच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे. कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर कोरोनाच्या प्रादुर्भावास प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. आपल्याला सरकारचे निर्णय आणि निकष यांचे पालन करावे लागेल. ग्रामीण भागात यंत्रणा उभारण्याच्या सूचना खासदार कपिल पाटील यांनी दिल्या. त्याकरिता मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. एकंदर भिवंडी शहर आणि ग्रामीण याकरिता या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारकडून राहून गेलेल्या कामांना गती मिळेल व मनुष्यबळ उपलब्ध होईल. यासाठी शासनस्तरावर शासनाला बोलून थांबणार नाही तर पाठपुरावा करण्याची जबाबदारी कर्तव्याच्या भावनेतून स्वीकारली आहे.यंत्रणेत झालेला फरक येणाऱ्या काळात नक्कीच दिसेल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. 
कोरोनामुळे समाजात अनेक अनुचित प्रकार घडत असून याच पार्श्वभूमीवर गरोदर महिलांचे प्रश्न, खासगी डॉक्टरांची दलाली आणि एजन्सी अशा प्रकारच्या अनेक विषयांवर आजच्या बैठकी दरम्यान चर्चा झाली. तरी या बैठकीत झालेल्या चर्चेची शासन दखल घेईल. शासनाने दखल घेतली नाही तर  प्रशासनाला आणि सरकारला धारेवर धरण्याचे काम विरोधी पक्ष नेता या नात्याने केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दरेकर यांनी दिला. कोरोनाच्या संकटात शासनाला सहकार्य करण्याची तयारी आहे. परंतु त्रुटी, उणिवा व दोष हे जर दूर झाले नाही आणि कोरोना जास्त पसरला तर आम्हाला जाब हा विचारावाच लागेल कारण हा जनतेच्या जिविताचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात राज्यात रुग्ण वाढता कामा नये याची शासनाने दक्षता घ्यावी, अशा प्रकारच्या प्रामाणिक उद्देश विरोधी पक्ष या भूमिकेतून आमचा आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये हा सकरात्क बदल घडून कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झालेला दिसेल अशी आशाही दरेकर यांनी व्यक्त केली.