‘तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीचं फेरीवाल्यांकडे आम्ही बघतो’ कल्पिता पिंपळेंना राज ठाकरेंचा शब्द

“ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील." अशी धमकीच राज ठाकरे यांनी दिली आहे.

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेहे आज ठाणे  दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.  सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.

    यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय.” असं राज ठाकरे म्हणाले.

    राज ठाकरेंचा फेरीवाल्यांना इशारा

    ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला होता. “ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.” असं राज ठाकरे म्हणाले.