कल्याण-डोंबिवलीची दुर्दशा करण्यात सेना भाजपचा समान वाटा- आमदार राजू पाटील यांची टीका

कल्याण : गेल्या २५ वर्षापासून युतीत असलेली भाजपा काही महिन्यापूर्वी वेगळी काय झाली जणू आम्ही त्यांच्यातले नाहीच अशा अविर्भावात जबाबदारी झटकण्याचे काम करत असून कल्याण डोंबिवलीची दुर्दशा

 कल्याण :  गेल्या २५ वर्षापासून युतीत असलेली भाजपा काही महिन्यापूर्वी वेगळी काय झाली जणू आम्ही त्यांच्यातले नाहीच अशा अविर्भावात जबाबदारी झटकण्याचे काम करत असून कल्याण डोंबिवलीची दुर्दशा करण्यात सेना-भाजपचा समान वाटा असल्याची टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तसेच कल्याण डोंबिवलीमध्ये एक कडक लॉकडाऊन नव्हे कर्फ्यु घोषित करणे गरजेचे असून तसे न झाल्यास बेड न मिळाल्याने रुग्ण रस्त्यावर आपले प्राण सोडतील, अशी भीतीही आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

केडीएमसीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून युतीचीच सत्ता आहे. जवळजवळ २० हजार कोटीपेक्षा जास्त बजेट या काळात मंजुर झाले. परंतु आरोग्य सेवेच्या नावाने बोंबाबोंबच आहे. मागच्या सरकारमध्ये डोंबिवलीचे आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री, पालकमंत्री हेच आरोग्यमंत्री पण होते आणि खासदार तर डाॅक्टरच आहेत. तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच राहिल्याची घणाघाती टिका आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तर भाजपानेही आता आपली जबाबदारी झटकण्याचे काम करू नये. या दोन्ही शहरांची दुर्दशा करण्यात दोन्ही पक्षांचा वाटा समान असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. तसेच एकीकडे सत्ताधारी आरोग्यसेवा तयार करू शकले नाहीत म्हणून सध्या करोडो रुपये खर्च करून खाटा टाकायची कामं करत आहे. तर दुसरीकडे गेल्या लाॅकडाऊनला विरोध करून नंतर होणाऱ्या प्राणहानीवरून राजकारण करण्याचे जर कोणी मनात आणत असेल तर ते माणूसकीला धरून होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना काळात नुसतेच राजकीय आरोप प्रत्यारोप करायचे नाही हे आपण आधीच ठरवले होते. परंतु आज महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या गेल्या १२/१३ दिवसापासून रोज साधारण ७ ते ८ मिनिटात एक रूग्ण या वेगाने वाढत आहेत. केडीएमसीकडे उपलब्ध बेड आणि रूग्णांची संख्या समान झाली झाली असून याआधी घेतलेल्या लाॅकडाऊन काळात पुरेश्या सोई उपलब्ध करण्यात प्रशासन सपशेल कमी पडल्याचे दिसत असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १५ दिवसाचा ‘लाॅकडाऊन नव्हे कर्फ्यू’ प्रशासनाने घोषित करणे गरजेचे आहे. नाहीतर यापुढे रुग्णांना बेड न मिळाल्याने रस्त्यावर आपला प्राण सोडवे लागतील अशी भिती व्यक्त करत एक कडक लाॅकडाऊन घेणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार आमदार राजू पाटील यांनी यावेळी केला.