सगळ्या कोरोनाग्रस्तांना मोफत उपचार द्या – आ. राजू पाटील यांची मागणी

कल्याण : महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे या दिवशी राज्यातील कोरोनाग्रस्त १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र प्रत्यक्षात ही घोषणा हवेतच विरली असल्याचे

 कल्याण : महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे या दिवशी राज्यातील कोरोनाग्रस्त १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र प्रत्यक्षात ही घोषणा हवेतच विरली असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याची घोषणा केली. मग आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना बिल का आकारले जात आहे? कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का? असा सवाल राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना केला असून राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याबाबतच्या निर्णयाबाबत सर्व रुग्णालयांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. कल्याणमधील होलीक्रॉस, डोंबिवलीमधील आर.आर. आणि पडले येथील नियॉन या खासगी रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांकडून या रुग्णालयांच्या प्रशासनाला पत्रक काढून रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णाकडून उपचारासाठी बिल आकारण्याच्या पद्धती विशद केल्या आहेत. वास्तविक शासनाकडून कोरोना रुग्णांसाठी मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली असेल तर अशा पध्दतीने बिल आकारण्याबाबत पत्रक कसे काढण्यात आले आहे, त्यामुळे सर्वजण संभ्रमात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.