डोंबिवली : कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस दुप्पटीने वाढत असून आता पालिका क्षेत्रातील कोविड-१९ रुग्णालये पूर्णपणे भरली आहेत. डॉक्टर, नर्स इतर कर्मचारी आणि व्हेंटीलेटर आदींची कमतरता भेडसावू

 डोंबिवली : कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस दुप्पटीने वाढत असून आता पालिका क्षेत्रातील कोविड-१९ रुग्णालये पूर्णपणे भरली आहेत. डॉक्टर, नर्स इतर कर्मचारी आणि व्हेंटीलेटर आदींची कमतरता भेडसावू लागत असून आयुक्तांनी नगरसेवकांकडे वेगळ्या सुविधांची मागणी केली आहे. कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात कडक लॉकडाऊन करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा शहरात होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य मिळत नाही. लॉकडाऊन उठविल्याने नागरीक शहरात गर्दी करीत असून नियमांचे पालन करीत नसल्याचे उघड होत आहे. मोठ्या प्रमाणात संक्रमण होत असून रुग्ण वाढ होत आहे. यामुळे शहरातील सर्व कोविड-१९ रुग्णालयात आता रुग्णांना जागा नसून आता येथील रुग्णांनी कोणाकडे दाद मागायची अशी परिस्थिती पालिका परिक्षेत्रात दिसून येत आहे. दररोज रुग्णांची संख्या दोनशेने वाढत असल्याने कडक लॉकडाऊन हाच उपाय यशस्वी होईल, असे वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील करीत आहेत.

पालिका क्षेत्रात कोरोनामुळे प्रशासनाची झोप उडवली असून कोरोना रुग्णांचा आकडा १५०० वर गेला आहे. मे महिन्यात केवळ ६५० कोरोना रुग्ण असताना केवळ पंधरा दिवसात दुपटीने वाढ होते ही चिंतेची बाब प्रशासनासमोर आहे. लॉकडाऊन उघडल्यामुळे खाजगी आणि सरकारी कर्मचारी चाकरमान्यांची संख्या पालिका क्षेत्रात मोठी असल्याने या कोरोना महामारीला प्रसासानाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील खास सूत्राने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारीवर्गाची अपुरी संख्या असतांना कोरोनावर कसं नियंत्रण राखायचं हा यक्ष प्रश्न आहे. डॉक्टर आणि नर्स रुग्णालयातच औषधे घेऊन काम करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आवाहन करूनही त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. खाजगी डॉक्टर आपला काही अमूल्य वेळ देत असले तरी ते पुरेसे नाही. यामुळे कोरोना संक्रमण कमी कसे होतील यावर उपाय शोधला जात आहे.
 
पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खासदार, आमदार, नगरसेवक आदी अनेक लोकप्रतिनिधींशी संवाद साधून यावर उपाययोजना केल्या असल्या तर त्या कमी पडत आहेत. शासनाच्या माध्यमातूनही अनेक योजना कार्यान्वित होत असल्या तरी त्या तुटपुंज्या ठरत आहेत. ज्याप्रमाणे भिवंडीत कोरोना मृत्यूदरवाढीमुळे पुन्हा लॉकडाऊन करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत तसे प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत व्हावेत अशी मागणी जोर धरत आहे. दररोज कोरोना रुग्णांची वाढ दोनशेवर होत असून पालिका प्रशासनाने कितीही हजारो बेडची संख्या वाढवली तरी काही उपयोग होणार नाही. आता कडक लॉकडऊन करून कोरोनाचे संक्रमण कमी केले तरच कोरोनावर मात करता येईल. डॉक्टर, नर्स, पालिका कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत असून संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे यासाठी प्रशासनाने वेळीच काळजी घेतली पाहिजे.
 
याबात माजी स्थायी समिती सभापती तथा जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले की, नागरिकांनी आता स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. कोरोनाने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. याबरोबर आता चीनशीही लढा द्यावा लागणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्याशीही दोन हात करायचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग वाढू नये याची काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहून कोरोनावर मात करावी. सरकार आणि पालिका प्रशासन तत्पर आहे घाबरू नये. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर पालिका क्षेत्रात झाले तर मात्र पुन्हा कडक पावले पालिका प्रशासन निश्चित उचलेल. याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याची संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पूर्णपणे लॉकडाऊन न करता आवश्यक असणाऱ्या विभागात लॉकडाऊन करण्याचा विचार करता येईल.