murder

जमील शेख यांच्या हत्येनंतर राबोडी परिसरात वातावरण तंग झाले होते. हत्येनंतर जमील खान यांचा पुतण्या फैसल तुफेल शेख याने पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनीच काटा काढण्यासाठी जमील शेख यांची हत्या केल्याचा दाट संशय फैसल शेख याने व्यक्त केला आहे.

ठाणे : भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाने(jameel sheikh murder case) आता राजकीय वळण घेतले आहे. ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे सांगत,  जमील खान यांच्या पुतण्याने ठाणे पोलिसांकडे केलेल्या फिर्यादीत राष्ट्रवादी पक्षाचे अभ्यासू नगरसेवक नजीब मुल्ला(najeeb mulla) यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नगरसेवक मुल्ला चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत. दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना फोनवरुन संपर्क करून खऱ्या सूत्रधाराला आणि आरोपींना अटक करण्याची विनंती केली आहे.

जमील शेख यांच्या हत्येनंतर राबोडी परिसरात वातावरण तंग झाले होते. हत्येनंतर जमील खान यांचा पुतण्या फैसल तुफेल शेख याने पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनीच काटा काढण्यासाठी जमील शेख यांची हत्या केल्याचा दाट संशय फैसल शेख याने व्यक्त केला आहे. जमील शेख यांच्यावर २०१४ सालीही हल्ला करण्यात आला होता, याबाबत मृत जमील यांनी त्यावेळी दिलेल्या तक्रारीत नजीब मुल्ला यांना आरोपी करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आल्याचेही, या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मृत जमील शेख हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक नाजीब मुल्ला हे त्यांचे कट्टर विरोधक असल्याचेही फिर्यादीत लिहिण्यात आले आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून नजीब मुल्ला करत असलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती मृत जमील शेख हे गोळा करत होते, मुल्ला यांच्या गैरकायदेशीर कामात यामुळे वारंवार अढथळा निर्माण होत होता, यातूनच जमील यांचा काटा काढण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप फैसल शेख याने केला आहे. याबाबत राबोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना संपर्क होऊ शकलेला नाही.

विरोधी पक्षनेते दरेकरांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

समाजसेवक व मनसे कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकर अटक करावी. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी विनंती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना फोन करून केली आहे.  ठाण्यात  दिवसाढवळ्या घडलेल्या हत्याकांडाची विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर दखल घेतली. ठाण्यातील कायदा व्यवस्थेबरोबरच शांतता कायम राहावी, यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या सुत्रधारांना गजाआड करावे. तसेच त्यातील कट उघड करावा, अशी विनंतीही दरेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान नजीब मुल्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.